781 धावांचा वर्षाव! जेमिमा रोड्रिग्जने घडवला इतिहास, INDW vs AUSW सामन्यात विक्रमांची लाट
भारताने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले असून आता त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. यंदा महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे, कारण इतिहासात पहिल्यांदाच महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड आहे.
हा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच 300 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य नॉकआउट सामन्यात पाठलाग करत पार करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेले 339 धावांचे लक्ष्य जेमिमा रोड्रिग्जच्या शतकाच्या जोरावर भारताने गाठले. ही महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या चेज आहे.
या सामन्यात अनेक विक्रम घडले–
वनडे वर्ल्ड कपच्या नॉकआउट सामन्यात प्रथमच 300 पेक्षा जास्त धावा झाल्या. हे पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच घडले.
यंदाच्या महिला विश्वचषकात पहिल्यांदाच ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड अंतिम फेरीत आहे.
भारताने 339 धावांचे लक्ष्य पार करत महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा रनचेस नोंदवला.
नॉकआउट सामन्यात प्रथमच 300 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य पाठलाग करत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. यापूर्वीचा विक्रम इंग्लंडचा (219 धावा, 2017 उपांत्य सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध) होता.
भारताने विश्वचषकात यापूर्वी कधीही 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य चेज केले नव्हते.
या पराभवाने ऑस्ट्रेलियाच्या सलग 15 विजयांच्या मालिकेला पूर्णविराम लागला. 2022 नंतर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा हरला आहे.
जेमिमा रोड्रिग्ज वर्ल्ड कप नॉकआउट सामन्यात रनचेस करत शतक करणारी पहिली भारतीय ठरली.
पुरुष क्रिकेटमध्येही आजवर कोणी हे साध्य केलेले नाही. 2011 च्या अंतिम फेरीत गौतम गंभीरने 97 धावांची खेळी केली होती, पण शतकापासून तो थोडक्यात दूर राहिला होता.
या सामन्यात एकूण 781 धावा झाल्या, ज्यामुळे महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा झालेला सामना म्हणून या सामन्याची नोंद झाली. याआधीचा विक्रम (679 धावा) हाच भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील लीग सामन्याचा होता.
जेमिमा रोड्रिग्जच्या शतकासह हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने दाखवलेली झुंजार कामगिरीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत इतिहास रचला आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष अंतिम फेरीकडे लागले आहे, जिथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नव्या विश्वविजेत्याचा उदय होणार आहे.
 
			 
											
Comments are closed.