इंदिरा गांधी मोदींपेक्षा कठोर होत्या
वृत्तसंस्था/नालंदा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूर रोखल्याचा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 50 वेळा अपमान केला आहे. परंतु मोदींमध्ये ट्रम्प खोटे बोलत असल्याचे सांगण्याचे धाडस नाही असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारच्या नालंदा येथील सभेत केला. 1971 मध्ये अमेरिकेने स्वत:च्या नौदलाचा मोठा ताफा रवाना केला होता, परंतु तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमेरिकेच्या नौदलाला घाबरत नाही, आम्हाला जे करायचे आहे ते आम्ही करू असे ठणकावून सांगितले होते. इंदिरा गांधी महिला होत्या, तरीही मोदींपेक्षा त्या अधिक कणखर होत्या, असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले आहेत.
ट्रम्प यांनी भारताची 7 विमाने नष्ट झाल्याचा दावा केला. तरीही ट्रम्प खोटं बोलत असल्याचे सांगण्याचे धाडस मोदींमध्ये नाही. मोदी हे ट्रम्प यांना भेटण्यासाठी विदेश दौऱ्यावर जाणार होते, परंतु भीतीपोटी त्यांनी दौरा रद्द केल्याचा दावा राहुल यांनी केला आहे. बिहारमध्ये सरकार मुख्यमंत्री नितीश कुमार चालवत नसून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह चालवत आहे. केंद्रात इंडी आघाडीची सत्ता आल्यावर नालंदाला पुन्हा शिक्षणाचे जागतिक केंद्र केले जाईल असे राहुल गांधी यांनी म्हटले.
मोदींच्या हातात रिमोट कंट्रोल
मोदींच्या हातात नितीश कुमारांचा रिमोट कंट्रोल आहे. मोदी जे बटन दाबतात तेच चॅनेल नितीश कुमार चालू करतात. पेपर लीकमुळे प्रामाणिक आणि मेहनती युवांचे नुकसान झाले आहे. बिहारमध्ये उद्योगासाठी जमीन नसल्याचे अमित शाह सांगत आहेत. परंतु अदानींना एक रुपयात जमीन मिळत असल्याचा आरोप राहुल यांनी केला.
 
			 
											
Comments are closed.