'मिलान 2026' सरावात 55 देश सहभागी झाले आहेत

फेब्रुवारीमध्ये आयोजन : अमेरिका, रशियाची नौदल पथकेही समाविष्ट होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताने येत्या फेब्रुवारी महिन्यात विशाखापट्टणम येथे ‘मिलन 2026’ या सागरी सरावाचे आयोजन केले आहे. नौदलाच्या या सरावामध्ये अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांच्या नौदलाचे पथक समाविष्ट होणार असून एकंदर 55 देशांचा सहभाग राहणार आहे. दिल्ली येथील पत्रकार परिषदेत नौदलाचे उपप्रमुख संजय वात्सायन यांनी सर्वात मोठ्या ‘मिलन 2026’ सरावाबद्दल तपशीलवार माहिती दिली. व्हाइस अॅडमिरल संजय वात्सायन यांनी पुढील वर्षी 19 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आठवडाभर चालणाऱ्या लष्करी सरावाची घोषणा केली.

‘मिलन’ सराव हा भारतीय नौदलाने मित्र देशांच्या नौदलांदरम्यान व्यावसायिक संवाद आणि लष्करी सहकार्य वाढविण्यासाठी आयोजित केलेला द्वैवार्षिक बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय फ्लीट रिह्यू आणि सराव मिलानमध्ये सहभागी होण्याची पुष्टी केली आहे. हे देश आपापली जहाजे पाठवतील. तसेच काही विमाने देखील दाखल होणे अपेक्षित असल्याचे नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय वात्सायन यांनी सांगितले.

मिलन सरावापूर्वी 18 फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम येथे त्याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय फ्लीट रिह्यू आयोजित केला जाईल. 2026 मध्ये भारत तिसरा आंतरराष्ट्रीय फ्लीट रिह्यू आयोजित करत आहे. यापूर्वी 2001 आणि 2016 मध्ये हे आयोजन केले होते. नौदल सरावात 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी बंदर टप्पा असेल, त्यानंतर 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान बंगालच्या उपसागरात एक अत्यंत जटिल ऑपरेशनल आणि सागरी टप्पा असेल, असे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले. सागरी टप्प्यात पाणबुडीविरोधी सराव, हवाई आणि सागरी ऑपरेशन्सचा समावेश असून ते गुंतागुंतीचे आणि गतिमान असणार आहे.

अमेरिका, रशियाकडून सहभागाची पुष्टी

अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश या सरावामध्ये निश्चितपणे सहभागी होणार आहेत. दोन्ही देशांनी आपापली जहाजे पाठवण्याचे संकेत दिले आहेत. तसेच या देशांचे हवाई दल पथकाही समाविष्ट होऊ शकते. यासंबंधीची बोलणी अजूनही प्रगतीपथावर आहेत. आम्ही मोठ्या संख्येने देशांना निमंत्रणे पाठवली असून आतापर्यंत आम्हाला 55 हून अधिक देशांकडून तिन्ही कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणारे प्रतिसाद मिळाले आहेत. मोठ्या संख्येने नौदल केवळ त्यांची जहाजे पाठवूनच नव्हे तर उच्च-स्तरीय वचनबद्धतेद्वारे देश सहभागी होत आहेत. या सरावाला अजून चार महिने शिल्लक असल्यामुळे आणखी काही देशही या सरावात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करू शकतात, असे पत्रकार परिषदेत व्हाइस अॅडमिरल संजय वात्सायन म्हणाले.

भारतीय नौदल सदैव सज्ज

सध्याच्या परिस्थितीमुळे हिंद महासागर क्षेत्रात बाह्या-प्रादेशिक शक्तींची उपस्थिती कायम आहे. आम्ही चाचेगिरीपासून ते मानवी तस्करी, ड्रग्ज इत्यादी प्रत्येक पैलूवर लक्ष ठेवतो. सद्यस्थितीत येथील आरमारासमोर अनेक आव्हाने असल्यामुळे आम्ही सतर्क आहोत. कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत. यावर्षी आम्ही 10 जहाजे आणि एक पाणबुडी समाविष्ट केली आहे. डिसेंबर अखेरीस नौदलाला आणखी चार जहाजे मिळण्याची अपेक्षा आहे, असेही वात्सायन यांनी सांगितले.

‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम अद्याप थांबलेली नाही, आम्ही ऑपरेशन सिंदूरसाठी पूर्णपणे सज्ज आणि तैनात आहोत, असे सांगतानाच परदेशी देशांशी आमच्या संवादात कोणताही खंड पडणार नही. तसेच आमच्या चालू असलेल्या सरावांमध्ये आणि आमच्या योजनांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नसल्याचेही नौदल अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

Comments are closed.