केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण

बिहारमध्ये रालोआचे घोषणापत्र जारी : राज्याच्या विकासाचा ब्ल्यूप्रिंट

वृत्तसंस्था/ पाटणा

रालोआने बिहार निवडणुकीकरता स्वत:चे घोषणापत्र जारी केले आहे. पाटण्यात रालोआतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत ‘संकल्प पत्र 2025’ नावाने घोषणापत्र सादर केले. मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा, केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी, चिराग पासवान आणि खासदार उपेंद्र कुशवाहृ बिहार भाजप प्रभारी धर्मेंद्र प्रधान, भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल, संजदचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांच्या उपस्थितीत जारी घोषणापत्राला विकसित बिहारचा ब्ल्यूप्रिंट संबोधिण्यात आले. या घोषणापत्रात केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन सामील आहे.

बिहारची जनता आता केवळ विकासाला प्राधान्य देते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात किती विकास झाला आहे हे बिहारची जनता जाणून आहे. पुढील 5 वर्षांमध्ये बिहारला एक औद्योगिक केंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे. 5 वर्षांमध्ये एक कोटीहून अधिक नोकऱ्या आणि रोजगार देण्याचा संकल्प आम्ही केला आहे. रोजगारासाठी महिलांना 2 लाख  रुपयांपर्यंतचा सहाय्यनिधी रालोआ सरकार देणार आहे. एक कोटी महिलांना ‘लखपति दीदी’ करण्याचे काम रालोआ सरकार करेल असे उद्गार भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी काढले आहेत.

अतिमागास वर्ग अन् शेतकऱ्यांवर जोर

रालोआ सरकारकडून मिशन करोडपती देखील सुरू करण्यात येईल. महिलांना करोडपती करण्याच्या दिशेने काम करू. अतिमागास समाजाच्या कामगारवर्गाला 10 लाख रुपयांचे सहाय्य दिले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेत एक आयोग स्थापन करू, जो अतिमागास समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिफारसी सरकारला करणार आहे. केंद्र सरकारप्रमाणे बिहार सरकारही राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 9 हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. या योजनेला कर्पूरी ठाकूर यांचे नाव देण्यात आल्याचा दावा चौधरी यांनी केला.

Comments are closed.