काँग्रेस कार्यकर्त्यांनी तेलंगणातील BRS कार्यालयावर हल्ला केला प्रतिक्रिया पाठवा

फर्निचरची जाळपोळ : कार्यकर्त्यांना मारहाण

सर्कल संस्था/हैदराबाद

तेलंगणातील खम्मम जिह्यातील मनुगुरु भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्थानिक बीआरएस (भारत राष्ट्र समिती) कार्यालयावर रविवारी हल्ला केला. कार्यालयाची तोडफोड करत आतील फर्निचरची जाळपोळही केली. या घटनेसंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात काँग्रेसचे झेंडे हातात धरलेले लोक बीआरएस कार्यालयात प्रवेश करत घोषणाबाजी करताना दिसत आहेत. या संघर्षादरम्यान दोन्ही बाजूंनी हाणामारीही झाली. यात काही लोक जखमी झाले.

हल्ला करण्यात आलेल्या कार्यालयावर काँग्रेसने आपले असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध करत ‘आमचे कार्यालय आम्हाला परत द्या’ अशी मागणी करत घोषणाबाजी केली. त्यानंतर तोडफोड करत कार्यालयातील साहित्याला आगही लावण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग आटोक्यात आणली. या संघर्षामुळे घटनास्थळी मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

बीआरएसच्या काळात त्यांचे कार्यालय जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले होते, असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलीस संरक्षणात तत्कालीन आमदाराने काँग्रेस कार्यालयावर कब्जा केला होता. त्यानंतर बीआरएसचे प्रतीक म्हणून त्यावर गुलाबी रंग लावला होता. आम्ही ते परत घेऊ, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत आहे.

Comments are closed.