होबार्टमध्ये हिंदुस्थानचा ‘सुंदर’ विजय; अर्शदीपचा प्रहार आणि वॉशिंग्टनच्या फटकेबाजीने मालिकेत साधली बरोबरी

होबार्टच्या थंडगार हवेत क्रिकेटचं तापमान इतकं वाढलं की, ऑस्ट्रेलियन्स उडया मारणं विसरूनच गेले. अर्शदीप सिंगच्या धारदार गोलंदाजीने सुरुवात झाली, वॉशिंग्टन सुंदरच्या फटकेबाजीने सामन्यांचा सुंदर शेवट झाला. जसप्रीत बुमरानेही अचूक आणि काटकसरी मारा करत ऑस्ट्रेलियाचे आव्हान पाच विकेट राखून बुडवले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर असलेल्या हिंदुस्थानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
तीन बदल, तीन जादूगार
सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला आणि संघात तीन बदल करून जणू जादूची कांडी फिरवली. अर्शदीप, वॉशिंग्टन आणि जितेश शर्मा या तिघांना संधी दिली आणि तिघांनीही संधीचं सोनं केलं. अर्शदीप सिंग 35 धावांत 3 विकेट काढून ‘सामनावीर’ ठरला. त्याने ट्रव्हिस हेड, जोश इंग्लिस आणि 64 धावांचा झंझावात दाखवणाऱ्या मार्कस स्टॉयनिस यांना परतीचा रस्ता दाखवला. त्याला वरुण चक्रवर्तीची दोन विकेट्सची साथ आणि बुमरानेही आपल्या गोलंदाजीचा ‘सायलेंट सपोर्ट’ लाभला.
अर्शदीपचा 'स्विंग दाखवा'
सुरुवातीला अर्शदीपने असा स्विंग आणला की, ट्रव्हिस हेड (6) आणि जोश इंग्लिस (1) यांचे डोळेच फिरले. पण नंतर मैदानात आला टीम डेव्हिड आणि त्याने ठरवलं, आता हिंदुस्थानी गोलंदाजांना माझं नाव लक्षात राहिलंच पाहिजे! बुमरावर चौकार-षटकारांचा तुफान मारा, अक्षरच्या षटकात उत्तुंग षटकार. डेव्हिडने तर समस्त हिंदुस्थानी गोलंदाजी पह्डून काढली. आधी 23 चेंडूंत अर्धशतक ठोकलं. 5 षटकार 8 चौकार खेचत त्याचे वादळ 78 धावांवर शमले. त्यानंतर स्टॉयनिस खेळला, पण बुमरा आणि अर्शदीपने शेवटच्या दोन षटकांत 16 धावा देत त्यांचा स्कोअर 186 वर थांबवला.
सुंदर आणि जितेशचा 'गोड समाप्त'
187 धावांचे लक्ष्य पाहून सुरुवात थोडीशी अनपेक्षितच झाली. अभिषेक शर्मा (25), शुभमन गिल (15), सूर्यकुमार (24), तिलक वर्मा (29) आणि अक्षर पटेल (17) यांनी फार मोठय़ा खेळय़ा केल्या नाहीत, पण आपला हातभार लावला. पण खरा ‘फिनिशिंग टच’ वॉशिंग्टन सुंदर आणि जितेश शर्माने दिला. या दोघांनी शेवटी 25 चेंडूंत 43 धावांची भागीदारी करत हिंदुस्थानचा विजय पक्का केला. सुंदरने 23 चेंडूंत नाबाद 49 धावा ठोकल्या. जणू त्याच्या बॅटने ‘क्रिकेट हा सुंदर खेळ आहे’ असं जगाला सांगितलं! जितेशने 13 चेंडूंत नाबाद 22 धावा मारत 18 महिन्यांनंतर ‘बॉलीवूड हिरो’सारखं पुनरागमन केलं.

Comments are closed.