SIR विरोधात तृणमूल काँग्रेस आक्रमक
प्रक्रियेच्या भीतीने आणखी एक मृत्यूचा दावा : मंगळवारी करणार निदर्शने
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये सत्तारुढ तृणमूल काँग्रेसने मतदार यादीच्या एसआयआरवरून निवडणूक आयोग आणि भाजपविरोधातील टीका तीव्र केली आहे. राज्याच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील आणखी एका व्यक्तीचा 2002 च्या मतदारयादीत स्वत:चे नाव नसल्याने बिगर-नागरिक घोषित करण्यात येईल या भीतीने मृत्यू झाल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. मृत इसम जिल्ह्यातील जमालपूर भागाचा रहिवासी होता आणि त्याचे नाव विमल संतरा होते असे तृणमूल काँग्रेसने एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.
भाजपच्या भय आणि द्वेषाच्या राजकारणामुळे आणखी एक अनमोल जीव हरपला असल्याचा दावा करणाऱ्या तृणमूलने विमल संतरा यांच्या मृत्यूच्या परिस्थितीचा तपशील तसेच पोलीस अहवालाची पुष्टी दिलेली नाही. यापूर्वी तृणमूलने बंगालमध्ये कथित स्वरुपात तीन जणांनी आत्महत्या केल्यावर भाजपवर निशाणा साधला होता. एसआयआरनंतर स्वत:चे नाव मतदारयादीतून हटविण्यात येईल या भीतीने या लोकांनी आत्महत्या केली होती असे तृणमूल काँग्रेसचे सांगणे आहे.
निवडणूक आयोग एसआयआरचा दुसरा टप्पा पश्चिम बंगाल समवेत 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करणार आहे, या राज्यांमध्ये पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. एसआयआरची प्रक्रिया 4 नोव्हेंबरपासून सुरु होत 4 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मतदारयादीचा मसुदा 9 डिसेंबर रोजी जारी केला जाईल आणि अंतिम मतदारयादीत 7 फेब्रुवारी रोजी प्रकाशित होणार आहे. एसआयआरच्या पहिल्या टप्प्यात बूथस्तरीय अधिकारी घरोघरी जात मतदार तपशीलाच्या पडताळणीसाठी एन्यूमरेशन फॉर्म भरणार आहेत.
कोलकात्यात मंगळवारी मोर्चा
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मतदार यादीच्या एसआयआरच्या विरोधात मंगळवारी कोलकात्यात विशाल मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चामध्ये ममतांचे भाचे आणि पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जीही सामील होणार आहेत. एसआयआर प्रत्यक्षात गुपचूपपणे केला जाणारा फेरफार आहे. सर्व पात्र मतदार या प्रक्रियेत सामील होतील आणि कुणाचेही नाव वगळले जाणार नाही हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लोकांसाठी आम्ही सर्व काही झोकून देणार आहोत असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.
भाजपही काढणार मोर्चा
दुसरीकडे पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी देखील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील पानीहाटीमध्ये भाजपच्या एका मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. हा मार्चा तृणमूल काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी असणार आहे. तृणमूल काँग्रेस एसआयआरवरून भीती अन् अफवा पसरवित असल्याचे या मोर्चाद्वारे लोकांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.
			
											
Comments are closed.