हत्येप्रकरणी जेडीयू उमेदवाराला अटक

बिहारमधील दुलारचंद यादव हत्या प्रकरणी कारवाई : 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

वृत्तसंस्था/ पाटणा

जनसुराज पक्षाचे समर्थक दुलारचंद यादव यांच्या हत्येच्या आरोपाखाली रविवारी बिहारमधील माजी आमदार आणि मोकामा येथील जेडीयू उमेदवार अनंत सिंग यांना अटक करण्यात आली. त्यांना खासदार-आमदार न्यायालयात हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. दुलारचंद यादव यांची 30 ऑक्टोबर रोजी प्रचारादरम्यान हत्या करण्यात आली होती.

पाटणा पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर जेडीयू उमेदवार अनंत सिंग यांना ताब्यात घेत प्राथमिक चौकशी सुरू केली होती. त्यानंतर अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. अटकेनंतर अनंत सिंग यांना पाटणा येथे आणल्यानंतर खासदार-आमदार न्यायालयात हजर करण्यात आले. आता अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. अनंत सिंग यांना दिवाणी न्यायालयातून बेऊर तुरुंगात नेण्यात आले आहे. यापूर्वी, अनंत सिंग आणि इतर आरोपींची डीआययू सेलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

30 ऑक्टोबर रोजी दुलारचंद यादव यांची हत्या

30 ऑक्टोबर रोजी पाटणाच्या मोकामा भागात जनसुराज पक्षाचे उमेदवार पियुष प्रियदर्शी यांच्या प्रचारादरम्यान झालेल्या वादावादीत दुलारचंद यादव यांची हत्या करण्यात आली. दुलारचंद यांच्या समर्थकांनी अनंत सिंग आणि त्यांच्या समर्थकांवर हत्येचा आरोप केला. ही घटना भदौर आणि घोसवारी पोलीस ठाण्यांजवळील मोकामा परिसरात घडली.

प्राथमिक तपासात सहभाग उघड

पाटणा एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी पाटणा जिल्हा दंडाधिकारी एस. एम. त्यागराजन यांच्यासोबत रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी दुलारचंद यादव यांच्या हत्येप्रकरणी अनंत सिंग, मणिकांत ठाकूर आणि रणजित राम या तिघांना अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, यादव यांचा मृत्यू हृदय आणि फुफ्फुसांना कठीण, बोथट वस्तूने झालेल्या दुखापतींमुळे झाला. साहजिकच शवविच्छेदन अहवाल आणि प्राथमिक तपासातून हे खुनाचे प्रकरण असल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. तपासात घटनेच्या वेळी तिघेही उपस्थित असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.

Comments are closed.