पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्


भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवले महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम फेरीत : आयसीसी महिला विश्वचषकातील प्रवास सलग तीन पराभवानंतर भारतीय संघाने जबरदस्त मुसंडी मारत थेट विश्वविजेतेपदाला (India Won Women’s World Cup 2025) गवसणी घालत रविवारी इतिहास रचला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला तब्बल 52 धावांनी पराभूत करून पहिल्यांदाच विश्वविजेतेपद जिंकले आणि पुन्हा एकदा देशवासियांना जल्लोषाची संधी दिली. संपूर्ण देशात जल्लोष सुरू होता, पण मैदानावर एक भावनिक दृश्य पाहायला मिळालं, जिथे आफ्रिकन खेळाडूंच्या डोळ्यांत पाणी होते, आणि भारतीय खेळाडू त्यांना सांत्वन देत होत्या.

पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले, पण…

सामन्याचा शेवटचा विकेट पडताच संपूर्ण स्टेडियम भारताच्या जयघोषांनी दुमदुमलं. पण दुसऱ्या बाजूला काही दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत आणि अंतिम सामन्यात अप्रतिम कामगिरी केली होती. सामन्यात शतक झळकावणारी कॅप्टन लॉरा वोल्वार्ड एका जागी शांतपणे बसली होती, तिचा चेहरा खूप उदास दिसत होता. बाकीचे संघही असेच अस्वस्थ होते. पण त्यावेळी कर्णधार हरमनप्रीत कौर, तसेच इतर वरिष्ठ आणि तरुण खेळाडूंनी आफ्रिकन संघाकडे जाऊन त्यांचं मनोबल वाढवलं. त्यांनी दाखवून दिलं की खरी स्पोर्टमनशिप म्हणजे केवळ विजय नाही, तर पराभवातही आदर देणं.


भारताचा पहिला महिला विश्वविजय

2005 आणि 2017 मध्ये थोडक्यात हातातून सुटलेलं विश्वविजेतेपद अखेर 2025 मध्ये टीम इंडियाने आपल्या नावावर केलं. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या ऐतिहासिक लढतीत भारतीय महिलांनी विनम्रता, शालीनता आणि क्रीडाभावनेचं अप्रतिम उदाहरण घालून दिलं.

भारत-दक्षिण अफ्रिकेचा अंतिम सामना कसा राहिला? (IND vs SA Womens World Cup Final 2025)

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 7 बाद 298 धावा केल्या. शेफाली वर्मा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज ठरली. तिने 78 चेंडूत 87 धावा केल्या, ज्यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. शेफालीने मानधना (45) सोबत 104 धावांची सलामी भागीदारी केली. दीप्ती शर्मानेही 58 चेंडूत 58 धावा केल्या, रिचा घोषने 24 चेंडूत 34 धावा केल्या, जेमिमाह रॉड्रिग्जने 24 आणि हरमनप्रीत कौरने 20 धावा केल्या.

भारताच्या 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्डने शतक केले. लॉरा वोल्वार्डने 98 चेंडूत 101 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि 1 षटकार होता. तर अ‍ॅनेरी डिर्कसेनने 35, सन लुसने 25 आणि तंजीम ब्रिट्सने 23 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून दीप्ती शर्माने सामना फिरवून टाकणारी गोलंदाजी केली. दीप्ती शर्माने उजव्या हाताच्या फिरकीपटूने 9.3 षटकांत 39 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या. शेफाली वर्माने दोन आणि श्री चरणीने एक विकेट घेतली.

हे ही वाचा –

IND vs SA Womens World Cup Final : अरे हे काय करतेय… जिंकल्यानंतर हरमनप्रीत ट्रॉफी घ्यायला गेली; पण जय शाहांनी अचानक रोखलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.