सदोष मतदार यादीवर निवडणुका नको! उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ठणकावले

‘मतचोरीचा विषय आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राच्या मतदार यादीत प्रचंड गडबड घोटाळा आहे. हा घोटाळा म्हणजे निवडणूक आयोगाची ‘करप्ट प्रॅक्टिस’ आहे. त्यामुळे जोपर्यंत ही सदोष मतदार यादी राज्य निवडणूक आयोग सुधारत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोच,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगाला ठणकावले. ‘निवडणूक आयोगाचा सर्व्हर आणि ‘सक्षम’ अॅप आयोगाकडून हाताळले जात नाहीत असा आमचा संशय आहे. कारण याच अॅपच्या माध्यमातून माझ्यासह माझ्या कुटुंबातील चौघांची नावे वगळण्याचा प्रयत्न झाला होता. या सगळ्यामागे कोण आहे, कोणाचा डाव आहे आणि काय डाव आहे याची खातरजमा करणे गरजेचे आहे. माझ्याबाबतीत हे होत असेल तर इतरांच्या बाबतीतही होऊ शकते. तसे झाल्यास दाद कोणाकडे मागायची? म्हणूनच आम्ही शिवसेनेच्या शाखांमधून मतदार ओळख केंद्रे सुरू करतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचे नाव घेतल्याशिवाय शहा आणि कंपनीला जेवण जात नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचा समाचार घेतला. ‘पुढील निवडणुकांसाठी आयोगाच्या मतदार याद्या गुरुवारी येतील. त्यानंतर त्यावर आक्षेप व सूचना मागवण्यात येतील. हीच ती वेळ आहे. या वेळेत कोणी झोपला तर तो संपला. याच वेळेत प्रत्येकाला आपले नाव मतदार यादीत आहे का याची खातरजमा करायची आहे. त्यादृष्टीने मतदारांच्या सोयीसाठी आम्ही शाखांमध्ये केंद्रे उघडत आहोत. नागरिकांनी या केंद्रात येऊन मतदार यादीत स्वतःचे नाव तपासावे. मतदान करता येणार आहे की नाही हे जाणून घ्यावे. वय, नाव, लिंग यात बदल झाला आहे का हे तपासावे, जेणेकरून गोंधळ असेल तर वेळीच सुधारून घेता येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ‘मतदार याद्या त्या-त्या सोसायटय़ांमध्ये, टॉवरमध्ये लागल्या पाहिजेत. त्यात कोणी घुसले आहेत का हे नागरिकांनीही पाहिले पाहिजे. असे झाले तरच लोकशाही टिकेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसभेनंतरच्या पाच महिन्यांच्या कालावधीत 45 लाख मतदार महाराष्ट्राच्या यादीत घुसवले गेले आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी सांगितलेय. असे घुसवलेले मतदार मतदान करत असतील तर ज्यांना अधिकृतपणे मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ती महाराष्ट्रातील मुलंमुली का मतदान करू शकत नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

शेलार यांनी फडणवीसांना ‘पप्पू’ ठरवले!

भाजपचे नेते व मंत्री ऍड. आशीष शेलार यांनी मतचोरीच्या मुद्दय़ावर आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, मनसेसह विरोधकांवर टीका केली होती. शिवसेना व मनसे फक्त हिंदू दुबार मतदारांची नावे सांगत असल्याचे ते म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरे बोलले. ‘फडणवीसांनी बिहारमधून आल्यानंतर त्यांना हे माहितीचे अमृत पाजलेले दिसत आहे. मात्र, आशीष शेलार यांनी आमच्यावर टीका करण्याच्या प्रयत्नात मतचोरी होत असल्याचे मान्य केले. ही कबुली देऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे ‘पप्पू’ ठरवले आहे. कारण, मतचोरी होत असल्याचे फडणवीस मान्यच करत नव्हते. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिपाक असेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. आमची मागणी पूर्ण मतदार यादी स्वच्छ करा अशी आहे. त्यात हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळे आले. अमुक एका समाजाचीच यादी दुरुस्त करा असे आम्ही कधीही म्हणालो नाही. आमचे एक वाक्य तसे असेल तर दाखवून द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांचे मानले आभार

शिवसेना ही बाळासाहेबांची आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची आहे, असे जाहीर विधान भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. हा एक प्रकारे चंद्रकांतदादांचा उठाव आहे. अन्याय सोसण्याचीही एक ताकद असते, ती संपली की लोक उठाव करतात. आशीष शेलारांप्रमाणे चंद्रकांतदादांनीही तो केला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘शिवसेनेचे नाव दुसऱया, तिसऱयाला देण्याचा अधिकार कोणालाही नाही. निवडणूक आयुक्तालाही नाही. म्हणूनच मी पहिल्या निवडणूक आयुक्ताला धोंडय़ा म्हटलं होतं. आता पुन्हा तेच केलं तर मी त्यांना गोटय़ा म्हणेन,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

ही तर निवडणूक आयोगाची भुताटकी

एकेका घराच्या पत्त्यावर आढळलेले 40-40, 50-50 मतदार ही निवडणूक आयोगाची भुताटकी आहे. आपल्या परवानगीशिवाय आपल्या घरात राहणारी, पण न दिसणारी कोणी माणसं आपल्या घरात आहेत का? आयोगाने उभी केलेली ही भुते आपल्या घरात तर नाहीत ना याची खात्रीही मतदारांनी शाखांमध्ये येऊन करावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Comments are closed.