वंदे भारत गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने प्रारंभ करण्यात आलेल्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्यांची लोकप्रियता चांगलीच वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली असून आगामी काळात ती आणखी वाढणार आहे. या प्रवासी रेल्वेगाड्या नेहमीच्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांपेक्षा बऱ्याच अधिक वेगाने धावतात.
नुकतीच रेल्वे विभागाने आणखी चार वंदे भारत गाड्यांचा प्रारंभ करण्यासाठी अनुमती दिली आहे. या गाड्यांची संख्या आता वाढत असल्याने चेन्नई येथील डबे निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्येही या गाड्यांचे विशेष डबे मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यात येत आहेत. सध्या संपूर्ण देशामध्ये 156 वंदे भारत गाड्या कार्यरत असून येत्या एक महिन्यात ही संख्या 164 पर्यंत पोहचणार आहे.
इंजिनेही भारतनिर्मित
या गाड्यांची वेगवान इंजिनेही भारताच निर्माण करण्यात येत आहेत. आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल मानण्यात येत आहे. देशातील प्रथम वंदे भारत रेल्वे 15 फेब्रुवारी 2019 या दिवशी धावली. गेल्या जवळपास पावणेसात वर्षांमध्ये या गाड्यांची संख्या वाढून 156 पर्यंत पोहचली आहे. या गाड्यांनी भारतीय रेल्वेमध्ये एक क्रांतीच घडवून आणली आहे, असे तज्ञांचे मत आहे. येत्या पाच वर्षांमध्ये ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
			
											
Comments are closed.