पोलीस ‘त्या’ नेत्याचीही चौकशी करणार, रोहित आर्याच्या संपर्कात आलेल्यांचे जबाब नोंदवणार

पवईच्या स्टुडिओत १९ जणांना ओलीस ठेवल्यानंतर रोहित आर्याला पोलीस शरण येण्यास वारंवार सांगत होते. तेव्हा त्याने एका राजकीय नेत्याचे नाव घेत त्याला फोन लावायला सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्या नेत्याला संपर्क केला मात्र त्यांनी रोहितसोबत बोलण्यास नकार दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा गुन्हे शाखा तपास करत असून संबंधित नेत्याचीही चौकशी केली जाणार, असे सांगण्यात आले.
रोहित आर्याने ओलीस नाटय का केले. तो तसे करणार होता हे कोणाला माहीत होते का?, तो त्याबाबत कोणाकडे बोलला होता का?, गेल्या काही काळात रोहित कोणा कोणाच्या संपर्कात आला होता, या सर्व बाबींची गुन्हे शाखा चौकशी करत आहे.
रोहितने १७ मुलांना ऑडिशनसाठी बोलावले होते. त्याच बरोबर त्याने मराठी सिनेसृष्टीतील काही कलावंतांना देखील बोलावले होते. त्यापैकी काही कलावंत आरए स्टुडिओ येथे गेले होते. त्या कलावंताचाही जबाब पोलीस नोंदवणार आहेत. त्या कलाकारांशी रोहितचे काय बोलणे झाले, त्याने कलाकारांना काय सांगून स्टुडिओत बोलावले, हे देखील पोलीस तपासत आहेत.
पोलिसांचा मला फोन आला होता – दीपक केसरकर
‘पोलिसांचा मला फोन आला होता. पण मी आता मंत्री नाही किंवा कुठल्याही जबाबदार पदावर नाही. हा मुद्दा थकबाकीशी संबंधित असल्याने माझ्याऐवजी संबंधित विभागाच्या अधिकायांशी त्याचे बोलणे करून द्या, असे मी त्यांना सांगितले’ अशी प्रतिक्रिया माजी शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी माध्यमांना दिली.
अमोल वाघमारे, स्टुडिओ मालकाचा जबाब नोंद
रोहितच्या छातीत गोळी झाडून त्याला यमसदनी धाडणाऱ्या सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे तसेच ओलीस नाट्य घडले त्या स्टुडिओच्या मालकाचा आणि काही पोलीस अधिकाऱ्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. रोहितच मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यातून काही माहिती हाती लागते का? ते सुद्धा पोलीस पाहत आहेत.

Comments are closed.