पालघरमधील बाराशे कंत्राटी शिक्षकांना अखेर वेतन मिळाले, 9 कोटी 43 लाख रुपये खात्यात जमा

पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पालघर जिल्हा परिषदेमध्ये भाषा विषय शिकवणाऱ्या बाराशे कंत्राटी शिक्षकांना त्यांचे वेतन मिळाले आहे. वेतनाअभावी या शिक्षकांची दिवाळी कोरडी गेली होती. कंत्राटी शिक्षकांच्या थकीत वेतनाबद्दल दैनिक ‘सामना’ने आवाज उठवताच जिल्हा परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले. दिवाळीच्या सुट्टीमुळे हे पगार रखडले होते आता जिल्ह्यातील सर्व बाराशे शिक्षकांचे पाच महिन्यांचे 9 कोटी 43 लाख रुपये वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यामुळे उशिरा का होईना या शिक्षकांना अखेर न्याय मिळाला आहे.
पालघर जिल्हा परिषदेत अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेने कंत्राटी मानधन तत्त्वावर बाराशे शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यामध्ये काही शिक्षकांना 16 हजार रुपये प्रति महिना तर काही शिक्षकांना 20 हजार रुपये प्रति महिना वेतन ठरवण्यात आले होते. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यापर्यंतचे वेतन न आल्याने शिक्षकांची अवस्था वाईट झाली होती. काही शिक्षकांचे घर या कंत्राटी नोकरीवरच आहे. याबाबतचे वृत्त दैनिक ‘सामना’ मध्ये 11 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केले होते. पाच सहा महिने वेतन नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च, शाळांची फी, घर खर्च चालवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर आला होता. म्हणून अनेक शिक्षकांनी मित्रांकडून किंवा व्याजाने पैसे घेऊन वेळ मारून नेली.
असे हलले प्रशासन
दिवाळीच्या आधी राज्य सरकारने कोषागार कार्यालयाला एकूण वेतन जमा केले. पण दिवाळीच्या सुट्टीमुळे वेतन होऊ शकले नाही. सुट्टी संपून एक आठवड्यानंतर कोषागार कार्यालयाने वेतन जिल्हा परिषदेच्या वेतन विभागाकडे दिले. जिल्हा परिषदेने तातडीने ही रक्कम आठ पंचायत समित्यांकडे पाठवली आणि तिथून ही रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा झाली. वेतन मिळाल्याने शिक्षक वर्गानी आनंद व्यक्त केला आहे.

Comments are closed.