कंपनीच्या चुकीमुळे एका रात्रीत कर्मचारी बनला लखपती!

रशियाच्या खांटी-मान्सियन्स शहरातील फॅक्टरीत काम करणारा कामगार व्लादिमीर रिचागोव याच्या बँक खात्यात अचानक 7.1 मिलियन रुबल म्हणजे सुमारे 87 लाख रुपये अकाऊंटंटच्या चुकीने ट्रान्सफर झाले. व्लादिमीर रिचागोव एका रात्रीत लखपती झाला. त्याने बँकेला पैसे परत करण्यास नकार दिला. हे प्रकरण आता रशियाच्या सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे.

व्लादिमीरला सुट्टीचा भत्ता म्हणून 58 हजार रुपये मिळणार होते. याशिवाय कंपनीकडून सर्व कर्मचाऱ्यांना बोनस सॅलरी मिळणार होती. मात्र जेव्हा त्याने मोबाईल बँकिंग अ‍ॅप सुरू केले तेव्हा त्याला धक्का बसला. कंपनीने भरभरून बोनस दिला असे त्याला वाटले, पण काही तासांनंतर अकाऊंट विभागातून त्याला फोन आला. पैसे चुकीमुळे ट्रान्स्फर झाल्याचे अकाऊंटंटने सांगितले. कंपनीच्या दुसऱ्या ब्रँचमधील 37 कर्मचाऱ्यांचा पगार त्याच्या खात्यात ट्रान्सफर झाला होता. मात्र व्लादिमीरने इंटरनेटवर कायद्याची माहिती घेतली आणि पैसे परत करण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर कंपनीतून पैसे परत करण्यासाठी दबाव वाढल्यानंतर त्याने एक कार खरेदी केली आणि तो दुसऱ्या शहरात राहायला गेला. हे समजताच कंपनीच्या सीईओने त्याला कोर्टात खेचले. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे.

Comments are closed.