IPL रिटायरमेंटनंतर रविचंद्रन अश्विनला धक्का, आता पुनरागमन होणार नाही? जाणून घ्या कारण

रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यासाठी अजून थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. तो बिग बॅश लीगच्या (BBL) पुढील हंगामात खेळणार होत, मात्र दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर झाला आहे. अश्विनने स्वतः सोशल मीडियावर एक मोठं निवेदन प्रसिद्ध करत सांगितलं आहे की, तो सिडनी थंडरसाठी खेळू शकणार नाही.

अश्विन संपूर्ण हंगाम सिडनी थंडरकडून खेळणार होता. जर तो मैदानावर उतरला असता, तर बीबीएलमध्ये खेळणारा भारताचा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला असता. पण त्याला गुडघ्याला दुखापत झाली आहे. तो जर लवकर बरा झाला, तर सिडनी थंडर त्याला मधल्या सत्रात पुन्हा संघात बोलावू शकते.

सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात अश्विन म्हणाला,
चेन्नईमध्ये BBL च्या पुढील हंगामाची तयारी करत असताना मला गुडघ्याला दुखापत झाली. तपासणीनंतर समजलं की, मी BBL 15 मध्ये खेळू शकणार नाही. हे सांगताना मला खूप वाईट वाटत आहे, कारण मी ऑस्ट्रेलियन चाहत्यांसमोर खेळण्यासाठी खूप उत्सुक होतो.

अश्विन म्हणाला की, तो जखमेतून सावरल्यानंतर नक्कीच पुन्हा परत यायचा प्रयत्न करेल. दुखापती असूनही सिडनी थंडरच्या खेळाडूंनी आणि स्टाफने त्याला खूप साथ दिली आहे. त्याने सांगितले की, तो मैदानावर उतरू शकणार नाही, पण थंडरच्या महिला आणि पुरुष संघांना तो मनापासून प्रोत्साहन देणार आहे.

रविचंद्रन अश्विनने याच वर्षी IPL मधून निवृत्ती घेतल्यानंतर BBL मध्ये सिडनी थंडरसाठी खेळणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, ILT20 लीगमध्ये त्याला कोणत्याही संघाने खरेदी केलं नव्हतं. बिग बॅश लीगचा 15 वा हंगाम 14 डिसेंबर ते 25 जानेवारीपर्यंत होणार आहे, आणि सिडनी थंडर आपला पहिला सामना 16 डिसेंबरला होबार्ट हरिकेन्सविरुद्ध खेळणार आहे.

Comments are closed.