'महिला संघाचा विजय वेगळा, 1983च्या वर्ल्डकपशी तुलना चुकीची!', माजी क्रिकेटपटूचे ठाम मत

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 जिंकत इतिहास रचला आहे. नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी धुव्वा उडवत पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर केली. तिसऱ्या प्रयत्नात भारताने अखेर खिताबाचे दुष्काळ संपवले. अनेकांनी या ऐतिहासिक विजयाची तुलना 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पुरुष संघाने जिंकलेल्या विश्वचषकाशी केली आहे.

त्या वेळी भारताने सर्व अडचणींवर मात करत वेस्ट इंडिजसारख्या प्रबळ संघाला पराभूत केले होते. तो विजय भारतीय क्रिकेटसाठी मैलाचा दगड ठरला होता. मात्र, त्या ऐतिहासिक संघाचा भाग असलेल्या महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी सांगितले की महिला संघाचा हा विजय 1983 सारखा नाही. त्यांनी यामागचे तर्क ‘द स्पोर्टस्टार’मधील कॉलममध्ये मांडले.

गावस्कर म्हणाले, “या विजयानं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की ट्रॉफी हुशारीनं जिंकता येतात. पदव्या नव्हे तर प्रगल्भ खेळातून. तसेच हेही दिसून आले की भारतीय प्रशिक्षकच आपल्या संघाला सर्वोत्तम निकाल मिळवून देऊ शकतात, कारण ते खेळाडूंना आणि भारतीय क्रिकेटच्या संस्कृतीला सर्वाधिक ओळखतात. काही जण या विजयाची तुलना 1983 शी करत आहेत, पण त्या वेळी पुरुष संघ कधीच ग्रुप फेरीपलीकडे गेला नव्हता, त्यामुळे नॉकआउट फेरी त्यांच्यासाठी पूर्णपणे नवी होती. मात्र महिला संघ दोनदा (2005 आणि 2017) अंतिम फेरीत पोहोचला होता, त्यामुळे त्यांचा अनुभव अधिक होता.”

2005 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून आणि 2017 मध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारल्यानंतर अखेर हरमन ब्रिगेडने स्वप्न साकार केले. गावस्कर पुढे म्हणाले, “जसा 1983 च्या विजयानं भारतीय क्रिकेटमध्ये नवा जोश आणि ओळख निर्माण केली, तसाच हा विजयही महिलांच्या क्रिकेटला नवे आयाम देईल. ज्या देशांनी भारताच्या आधी महिला क्रिकेटला सुरुवात केली, त्यांनाही आता या खेळात भारताचं बळ जाणवेल. त्या काळी 1983 च्या विजयानं पालकांना आपल्या मुलांना क्रिकेटकडे वळवण्यासाठी प्रेरणा मिळाली होती; तसंच आता या विजयामुळे भारताच्या कोपऱ्या-कोपऱ्यातील मुलींना मैदान गाठण्याची उमेद मिळेल. महिला प्रीमियर लीगनं ही प्रक्रिया आधीच सुरू केली आहे, आणि आता पालक आपल्या मुलींना क्रिकेट हा करिअर पर्याय म्हणून स्वीकारण्यास अधिक उत्सुक झाले आहेत.”

Comments are closed.