गोपीचंद हिंदुजा यांचे निधन

हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचे मंगळवारी लंडनमध्ये निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही आठवडय़ांपासून गोपीचंद हिंदुजा आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, दोन मुले संजय, धीरज व मुलगी रिता असा परिवार आहे.
गोपीचंद हे हिंदुजा समूहातील दुसऱया फळीतील नेतृत्व होते. मागील साडेसहा दशकांपासून ते समूहात वेगवेगळय़ा पदांवर कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचे मोठे बंधू श्रीचंद यांच्या निधनानंतर समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली होती. ती समर्थपणे पार पाडत त्यांनी उद्योग समूहाला यशोशिखरावर पोहोचवले. त्यांच्या कार्यकाळात हिंदुजा समूहाने बँकिंग, फायनान्स, ऊर्जा, ऑटो क्षेत्रात दबदबा निर्माण केला. त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने 1984 साली गल्फ ऑईल आणि 1987 साली अशोक लेलॅण्ड पंपनी ताब्यात घेतली.
सिंधी व्यापारी ते ब्रिटनमधील अब्जाधीश
गोपीचंद हिंदुजा यांचा जन्म 1940 साली (आताच्या पाकिस्तानातील) सिंध प्रांतातील एका सिंधी व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण मुंबईत गेले. 1959 मध्ये मुंबईतील जयहिंद कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरकडून त्यांनी कायदा विषयात तसेच, लंडनमधील रिचमंड कॉलेजमधून अर्थशास्त्राची मानद डॉक्टरेट मिळवली. उद्योग जगतात ‘जीपी’ नावाने ओळखल्या जाणाऱया गोपीचंद हिंदुजा यांची जगातील अब्जाधीशांमध्ये गणना होत होती.

Comments are closed.