‘म्हाडा’ने महापालिकेचा 575 कोटी मालमत्ता कर थकवला, वारंवार पत्र पाठवूनही दखल नाही

‘म्हाडा’ने मुंबई महानगरपालिकेचा तब्बल 575.26 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याची माहिती समोर आली आहे. हा थकीत कर भरण्यासाठी पालिकेने पत्राद्वारे वारंवार पाठपुरावा करूनही ‘म्हाडा’कडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे पालिकेचा दरमहा लाखोंचा महसूल बुडत आहे.
बडय़ा थकबाकीदारांकडे शेकडो कोटी मालमत्ता कर थकीत असल्याने पालिकेला मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामध्ये म्हाडाकडील थकबाकीचा आकडा 575 कोटींवर गेला आहे. यामध्ये म्हाडाच्या इमारती, कार्यालये आणि अनेक बडय़ा आस्थापनांकडील कोटय़वधीच्या थकबाकीचा समावेश आहे. दरम्यान, पालिका ‘म्हाडा’ला दरवर्षी म्हाडा अधिनियम कलम 97 (1) अन्वये मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाला दरवर्षी 10 कोटींचे अंशदान अनुदानही देते. असे असतानाही ‘म्हाडा’कडे शेकडो कोटींचा मालमत्ता कर थकवला आहे.
सरकार अधिकार असल्याने अभय?
थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी पालिका विशेष वसुली मोहीम राबवून नोटीस बजावणे, सील करणे आणि काही ठिकाणी कायद्यानुसार मालमत्ता सील करण्याची कारवाई पालिकेकडून बडय़ा थकबाकीदारांवर केली जाते. मात्र ‘म्हाडा’ हे सरकारी प्राधिकरण असल्याने पालिकेकडून कठोर कारवाई करण्यात अडचण येत असल्याचे बोलले जाते. मात्र याचा मोठा आर्थिक फटका पालिकेला बसतो.

Comments are closed.