जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर, फक्त एका भारतीयाला जमलंय असं पराक्रम!

IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (6 नोव्हेंबर) क्वीन्सलँडमध्ये रंगणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे. एका मोठ्या विक्रमापासून बुमराह फक्त दोन विकेट्स दूर आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या अर्शदीप सिंगच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 66 सामन्यांत 104 विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीप सध्या ऑस्ट्रेलिया मालिकेत भारतीय संघाचा भाग आहे आणि सातत्याने प्रभावी गोलंदाजी करत आहे.

दरम्यान, जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 78 टी20 सामन्यांत 98 विकेट्स घेतल्या आहेत. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात दोन विकेट्स घेतल्यास टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरेल. तिसऱ्या सामन्यात त्याला यश मिळाले नव्हते, परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने दोन गडी बाद केले होते. पहिला सामना मात्र पावसामुळे रद्द झाला होता.

टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पांड्यानेही आतापर्यंत 120 सामन्यांत 98 विकेट्स घेतल्या आहेत. परंतु, तो सध्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर आहे. हार्दिकचा विक्रम बुमराहच्या जवळचा मानला जातो.

यादीत चौथ्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. या अनुभवी लेग स्पिनरने 80 सामन्यांत 96 विकेट्स घेतल्या असून, ऑगस्ट 2023 नंतर तो कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तर अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पाचव्या स्थानावर आहे. त्याने 87 सामन्यांत 90 विकेट्स घेतल्या आहेत. भुवीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2022 मध्ये झाला होता.

Comments are closed.