चारपैकी तीन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज फेटाळले, अमेरिकेनंतर आता कॅनडाने दिला झटका

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी एकेकाळी हक्काचे ठिकाण असलेल्या कॅनडाच्या कठोर धोरणाचा फटका जगभरातील विद्यार्थ्यांना बसत आहे. विशेषतः कॅनडाने हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, कॅनडातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या चारपैकी तीन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे अर्ज फेटाळले गेले आहेत.

कॅनडाने अस्थायी स्थलांतरितांची संख्या कमी करण्यासाठी आणि व्हिसासंबंधी फसवणूक रोखण्यासाठी 2025 च्या सुरुवातीपासून सलग दुसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परमिटची संख्या घटवली आहे. इमिग्रेशन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2025 मध्ये सुमारे 74 टक्के हिंदुस्थानी अर्ज नाकारले गेले, तर दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये हा आकडा केवळ 32 टक्के होता. हिंदुस्थानी अर्जदारांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. ऑगस्ट 2023 मधील 20,100 च्या तुलनेत ऑगस्ट 2025 मध्ये ही संख्या 4,515 वर आली आहे. या कमी झालेल्या अर्जांपैकीही 74 टक्के अर्ज फेटाळले गेले आहेत.

चीनला तुलनेने कमी फटका

चीनच्या तुलनेत हिंदुस्थानींचे अर्ज नाकारण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. ऑगस्ट 2025 मध्ये कॅनडाने चीनचे सुमारे 24 टक्के अभ्यास परमिट अर्ज फेटाळले आहेत.

अलीकडच्या काही वर्षांत हिंदुस्थान आणि कॅनडाच्या संबंधात कटुता आली. माजी पंतप्रधान जस्टिन टडो यांनी 2023 मध्ये एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये हिंदुस्थान सरकारचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध बिघडले होते. कॅनडाच्या या कठोर भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये कॅनडाची लोकप्रियता कमी होत आहे.

Comments are closed.