273 सामने खेळलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर नशेच्या व्यसनात; संघातून तात्काळ हकालपट्टी
क्रिकेट हा शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीवर आधारित खेळ असून, खेळाडूंनी दीर्घ काळ मैदानात दमदार कामगिरी करण्यासाठी स्वतःला आरोग्यदायी जीवनशैलीत ठेवणे अत्यावश्यक असते. त्यामुळेच बहुतांश क्रिकेटपटू कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहतात. मात्र झिम्बाब्वेचा अनुभवी आणि स्थिरावलेला क्रिकेटपटू सीन विल्यम्स याने या शिस्तीला तडा दिला असून, त्याला आता त्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे.
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने (ZC) जाहीर केले आहे की, विल्यम्सचा सेंट्रल करार पुढील वर्षी म्हणजे 2025 नंतर नूतनीकरण केला जाणार नाही. याचबरोबर, राष्ट्रीय संघासाठी त्याच्या नावाचा निवडीमध्ये विचारही होणार नाही, असा स्पष्ट संकेत बोर्डाने दिला आहे. बोर्डाने जारी केलेल्या निवेदनानुसार, विल्यम्सवर अनुशासनभंगासह संघासाठी वारंवार अनुपलब्ध राहण्याचे आरोप आहेत. याचा थेट परिणाम संघाच्या तयारीवर आणि कामगिरीवर झाला असल्याचे बोर्डाने नमूद केले आहे.
सीन विल्यम्स यांनी बोर्डाला माहिती देताना सांगितले की तो नशेच्या व्यसनाशी झुंज देत आहे, आणि त्याने स्वखुशीने पुनर्वसन केंद्रात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी टी20 विश्वचषक आफ्रिका क्वालिफायरच्या आधीही विल्यम्स यांनी “वैयक्तिक कारणांमुळे” संघातून माघार घेतली होती. यानंतर झिम्बाब्वे क्रिकेटने त्याच्या अनुपस्थितीमागील कारणांचा तपास केला आणि त्यातून ही धक्कादायक माहिती पुढे आली.
39 वर्षीय सीन विल्यम्सने 2005 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आपल्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत झिम्बाब्वेसाठी एकूण 273 सामन्यांमध्ये भाग घेतला. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये मिळून 8000 हून अधिक धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक प्रभावी कामगिरी केली, ज्यात 5217 धावा, 8 शतके आणि 37 अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. यावर्षीच त्याने जेम्स अँडरसनला मागे टाकत सर्वाधिक काळ सक्रिय आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होण्याचा मान मिळवला होता.
परंतु आता त्याच्या करिअरवर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. कौशल्य आणि अनुभव असूनही, नशेच्या व्यसनाने एक मोठा खेळाडू कसा रुळावरून घसरू शकतो, याचे हे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. झिम्बाब्वे क्रिकेटने स्पष्ट केलं आहे की व्यसन आणि गैरशिस्तेला राष्ट्रीय संघात स्थान नाही.
Comments are closed.