शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. बुधवार सकाळपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील नांदर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी जर सरकार कर्जमुक्ती करत नसेल तर शेतकरी म्हणून तुम्ही सर्वांनी एकवटलं पाहिजे व त्यांना आपली वज्रमूठ दाखवून हे सरकारच ताब्यात घेतलं पाहिजे, असे आवाहन देखील केले.

”मी राजकीय प्रचार करायला आलेलो नाही. तुम्ही सर्वजण आता त्या सगळ्याला कंटाळला आहात. निवडणूका आल्या की आम्ही राजकीय नेते येतो व तुमच्या कोपराला गूळ लावून जातो. तुम्ही भोळे भाबडे आपलं आयुष्य कुणाला तरी देऊन टाकता. महाराष्ट्र व मराठवाड्यावर आपत्तीमागून आपत्ती येत आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाहीए. कधी नव्हे ते एवढं मोठं संकट मराठवाड्याने अनुभवलं. मराठवाडा हा अवर्षणग्रस्त भाग आहे. एवढा पाऊस कधी पाहिला नाही असं अनेकांनी सांगितलं. मी मोठा पाऊस झाला तेव्हाही आलेलो. तेव्हा माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली. तेव्हाही शेतकऱ्यांशीच बोललो. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मिळाले पाहिजे, कर्जमुक्ती झाली पाहिजे ही मागणी केली होती. आताही माझी तिच मागणी आहे. खरीप तर गेलं आहे. रब्बी देखील आता गेलं आहे. जमीनच खरडून गेली आहे. मग कसं घेणार तुम्ही पिकं? या दयावान सरकारचा अभ्यास सुरू आहे. मी मुख्यमंत्री असताना मी सरसकट कर्जमुक्ती केली होती. मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं. त्यावेळी मी कर्जमुक्ती करून दाखवली होती तेव्हा सगळी माहिती सरकार दरबारी जमा आहे. सर्व यंत्रणा सरकारकडे आहे. कर्जमुक्ती साठी आम्ही महात्मा फुले ही सरकारी योजना राबवली होती. तिची संपूर्ण माहिती सरकारकडे आहे. मग कसला अभ्यास करतायत हे? असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

”मुख्यमंत्र्यांनी एक अजब शोध लावला आहे. ते म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल. बँकांचा फायदा होऊ न देता कर्जमाफी कशी करतात याचं कुणीतरी मला गणित सांगा. तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा की आता जर कर्ज नाही फेडलं तर खरिपाचं कर्ज मिळणार का? 30 जूनला ते कर्जमाफी करणार असं म्हणतायत तर आता हफ्ते भरायचे की नाही ते त्यांनी सांगावं. भरायचे असेल तर कुठून भरायचे? ज्याची जमिन वाहून गेलीय तो आधी माती मागतोय. कर्ज फेडायच्या आधी माती तर द्या. हा विषय मी सोडणार नाही. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्यासोबत राहणार, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.

”आज पेपरमध्ये फोटो पाहिला की रात्री बॅटऱ्या मारून केंद्रीय पथकातले अधिकारी पाहणी करताय. आता केंद्राचं पथक आलंय. नंतर ते पथक परत जाणार. त्यानंतर ते अहवाल देणार. जिल्हापरिषदा निवडणूका होतील तेव्हा आपले दयावान पंतप्रधान तुमच्या कोपराला गूळ लावणार. पण आता जे पॅकेज जाहीर केलेले त्यातली मदत दिवाळीपर्यंत देणार होती. पण दिवाळी होऊन गेली. तुळशीचं लग्न होऊन गेले. पण मदत मिळाली नाही. ते पैसे मिळणार कधी? नुसतं पंचाग काढतायत, मुहुर्तावर मुहुर्त काढतायत. म्हणून मी तुला सांगायला आलोय की आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरू तेव्हा तुमची साथ पाहिजे. आम्हाला जूनची मदत मान्य नाही, आताच्या आता कर्जमुक्ती करा; तातडीने 50 हजार हेक्टरी द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पिकविम्याचे सहा रुपये मिळाले

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले का याबाबत विचारले असता तिथे उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्याला पिकविम्याची रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले. तर एका शेतकऱ्याने त्याच्या खात्यात पिकविम्याचे सहा रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती दिली. त्याने त्याच्या बँकेचे स्टेटमेंट देखील पुरावा म्हणून दाखवले.

Comments are closed.