मिर्झापूरच्या चुनार स्थानकावर भीषण अपघात, रेल्वेची धडक बसून 8 भाविकांचा मृत्यू

मिर्झापूर. देव दिवाळीला गंगेत स्नान करण्यासाठी वाराणसीला जाणाऱ्या भाविकांचा मंगळवारी भीषण अपघात झाला. चुनार रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून आठ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व भाविक सोनभद्रच्या चोपण भागातून वाराणसीला जात होते. ते एका पॅसेंजर ट्रेनने चुनार स्टेशनवर पोहोचले होते. तेथून दुसरी गाडी पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरून फलाट क्रमांक एकवर जाण्यासाठी त्यांनी फूट ओव्हर ब्रिजऐवजी थेट रेल्वे रुळ ओलांडण्यास सुरुवात केली. तेवढ्यात कालका एक्स्प्रेस जवळून गेली आणि त्याचा फटका भाविकांना बसला.
अपघातानंतर लगेचच आरपीएफचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात पाठवले. सर्व मृत महिला असून देव दिवाळीनिमित्त वाराणसीतील गंगेत स्नान करण्यासाठी जात होते, असे सांगण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनचा वेग इतका जास्त होता की, भाविकांच्या मृतदेहाचे तुकडे झाले, त्यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. माहिती मिळताच एसडीएम, एएसपी यांच्यासह रेल्वे आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. सध्या रेल्वे प्रशासनाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Comments are closed.