सरकारची मोठी घोषणा! वर्ल्डकप जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या तीन स्टार्ससाठी 2.25 कोटींचा रोख बक्षीस जाहीर

भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 25 धावांनी हरवून पहिला विश्वचषक भारताच्या नावावर आणला. हा विजय भारतीय महिला क्रिकेटसाठी एक मोठा टप्पा ठरला आहे, कारण याआधी भारताला महिला वनडे विश्वचषक जिंकता आला नव्हता.

या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघाचा सत्कार करण्याची घोषणा केली आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचे मान्य करून संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला. राज्य सरकारने संघातील महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी खास निर्णय घेतला असून, तीन प्रमुख खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

भारतीय संघामध्ये महाराष्ट्राचे तीन खेळाडू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सांगलीची कन्या आणि भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाचे प्रदर्शन विशेष उल्लेखनीय ठरले. स्पर्धेत तिने 54.25 च्या सरासरीने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 434 धावा केल्या आणि संघाला विजेत्या मार्गावर नेले. तसेच, भारताच्या सेमीफायनल विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारी जेमिमा रॉड्रीग्ज ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 127 धावांची ऐतिहासिक खेळी करून भारताला महिला वनडे इतिहासातील विश्वविक्रमी विजय मिळवून दिला. मैदानावर ती उत्कृष्ट फिल्डिंगसाठीही ओळखली जाते. तिसरी खेळाडू राधा यादवने फिरकी गोलंदाजीमध्ये संघाला जबरदस्त समर्थन दिले. राज्य सरकारने या तिन्ही खेळाडूंना प्रत्येकाला 2.25 कोटी रुपये रोख पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनाही त्यांच्या योगदानासाठी 22.5 लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, फक्त महाराष्ट्रातील खेळाडूंचाच नव्हे तर संपूर्ण भारतीय महिला संघाचा सत्कारही करण्यात येणार आहे. संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे महिला क्रिकेटला देशात आणि महाराष्ट्रात नव्या प्रेरणेची निर्मिती झाली असून, या यशाने भारतीय महिला क्रिकेटच्या भविष्यासाठी आशा आणि आत्मविश्वास वाढवला आहे.

Comments are closed.