एवढी घाई का? आधी मतदार यादीतील घोळ सुधारा मग निवडणूक घ्या, सुप्रिया सुळे यांची मागणी
राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र सरकारला 7 वर्षे घाई झाली नाही. एकदम असे काय झाले? जितकी आरोपाला धार वाढत गेली तेवढी निवडणुकीची घाई झाली, असा संतप्त सवाल केला आहे. त्यामुळे आधी मतदार यादीतील घोळ सुधारा मग निवडणूक घ्या, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शिवाय जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, त्याला आम्ही प्राधान्य देऊ, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला.
सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, खरंतर ही निवडणूक घेण्यात काही अर्थ नाहीय. कारण दुर्देव आहे. एका सशक्त लोहशाहीचा ज्याला सार्थ अभिमान आपल्या प्रत्येक भारतीयाला आहे. तिथे मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ होतोय तो दुरुस्त करा. तंत्रज्ञान एवढं बदललं आहे की, ते आपलं आयुष्य चांगल आणि सोपं करतं. त्यामुळे महिना, पंधरा दिवसात, दोन महिन्यात मतदार याद्यांमधील घोळ नीट करून जानेवारीमध्ये निवडणुका घेता येऊ शकत होते. काहीच घाई नव्हती. एवढी घाई का झाली. या महाराष्ट्र सरकारला 7 वर्षे घाई झाली नाही. एकदम असे काय झाले जितकी आरोपाला धार वाढत गेली तेवढी निवडणुकीची घाई झाली, अशी शंका सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केली.
आमचा पहिला प्रस्ताव आणि आमची इच्छा आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढावं. जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार त्याला आम्ही प्राधान्य देऊ. पुढे स्थानिक नेते त्यांच्या फिडबॅक काय येतो . त्याप्रमाणे नियोजन करुन पुढच्या आठ दिवसात चित्र स्पष्ट होईल, असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत
महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रश्न आहेत, महाराष्ट्र प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीतून चालला आहे. हा केंद्र सरकारचा डेटा आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. पुण्यासारख्या शहरात भरदिवसा काल क्रूर पद्धतीने हत्या झाली. हे पहिलेच प्रकरण नाही. मग पुण्याच्या कायदे सुव्यवस्थेवर कधी चर्चा होणार? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. महाराष्ट्रात गुन्हेगारी, गरीबी, बेरोजगारी आणि महागाई वाढलेली आहे. शेतकऱ्यांची दर तीन तासाला एक आत्महत्या होतेय हा मकरंद आबा पाटलांचा डेटा आहे जो त्यांनी विधानसभेत मांडला आहे. मग ही परिस्थिती असेल तर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार का नाही बोलत आहे? असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला.
आम्ही जरी विरोधक असलो तरी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतीसाठी एक विशेष सेशन बोलवा. चर्चा करुया. महाराष्ट्राच्या हितासाठी कधीतरी महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांनी मतभेद सोडून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या. जसे ऑपरेशन सिंदूरसाठी आम्ही देशाच्या हितासाठी सगळे एक झालो तशी महाराष्ट्राला आता गरज आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Comments are closed.