राजकारणी, सेलिब्रिटींच्या स्वागतासाठी रेड कार्पेटच का निळा, हिरवा, पिवळ्या रंगाचा का नसतो?
कोणत्याही भव्य कार्यक्रमात, सेलिब्रिटींच्या एंट्रीवेळी किंवा राष्ट्रप्रमुखांच्या स्वागतावेळी आपण नेहमीच लाल गालिचा म्हणजेच रेड कार्पेट पाहतो. पण कधी विचार केला आहे का हा गालिचा नेहमीच लालच का असतो? निळा, हिरवा किंवा सोनेरी का नाही? या लाल रंगामागे फक्त सौंदर्य किंवा ग्लॅमर नाही, तर त्याचा इतिहास, परंपरा आणि सन्मानाशी निगडित एक खोल अर्थ आहे. (why red carpet is used for vip welcome)
लाल गालिच्याची सुरुवात कधी झाली?
रेड कार्पेटचा पहिला उल्लेख सुमारे इ.स.पू. 458 मध्ये लिहिलेल्या ग्रीक नाटक ‘अॅगॅमेम्नॉन’ मध्ये आढळतो. या नाटकात ट्रोजन युद्धातून परतलेल्या राजा अगॅमेम्नॉनच्या स्वागतासाठी लाल गालिचा अंथरला जातो. त्या काळात लाल रंग राजघराण्याचा, सत्तेचा आणि प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जात होता.
यानंतर 1821 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्रो यांच्या स्वागतावेळी प्रथमच अधिकृतरीत्या रेड कार्पेट वापरला गेला. 1920 च्या दशकात हॉलिवूडमध्ये त्याचा फॅशन आणि फिल्म इव्हेंट्ससाठी वापर सुरू झाला आणि आजपर्यंत तो प्रतिष्ठा आणि आदराचं प्रतीक बनला आहे.
लाल रंगाचं खास महत्त्व काय?
लाल रंग केवळ नजरेत भरतो असं नाही, तर तो संपन्नता, सन्मान आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे. प्राचीन काळात राजे-महाराजे आपली मौल्यवान वस्तू लाल कपड्यात ठेवत असत, कारण लाल रंग म्हणजे मूल्यवान वस्तू असं मानलं जाई. त्यामुळे एखाद्या मान्यवराचं स्वागत करताना लाल गालिचा अंथरणं म्हणजे त्याला राजस सन्मान देणं असं दर्शवलं जातं. दागिन्यांच्या डब्यांमध्येही लाल रंगाचं कापड असतं अंगठी असो की नेकलेस, आतला रंग नेहमी लालच कारण हा रंग मूल्यवानतेशी जोडलेला आहे.
भारतात रेड कार्पेटचा वापर कधी सुरू झाला?
भारतात पहिल्यांदा 1911 साली दिल्ली दरबारात रेड कार्पेट वापरण्यात आला. तेव्हा व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंगे यांनी किंग जॉर्ज पाचव्या यांच्या स्वागतासाठी लाल गालिचा अंथरला होता. त्या दिवसापासून आजपर्यंत कोणत्याही शासकीय किंवा प्रतिष्ठित समारंभात रेड कार्पेटचा वापर सन्मानाचं प्रतीक म्हणून केला जातो.
लाल गालिचा हा फक्त शोभेचा भाग नाही, तर सन्मान, आदर आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. निळा किंवा हिरवा रंग शांततेचा आणि निसर्गाचा असला तरी, लाल रंगात आहे रॉयल आकर्षण. म्हणूनच आजही राजकारणी असोत, सेलिब्रिटी असोत किंवा आंतरराष्ट्रीय पाहुणे त्यांच्या स्वागताची ओळख म्हणजे तोच लाल गालिचा.
Comments are closed.