IND vs SA: मोहम्मद शमीचं करिअर संपतंय का? दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघातून वगळल्याने चाहत्यांचा संताप

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखाली ऋषभ पंत (Rishbh Pant) उपकर्णधार म्हणून परतला आहे, तसेच आकाश दीपलाही (Akash Deep) संघात स्थान मिळाले आहे. मात्र, पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीकडे (Mohmmed Shami) दुर्लक्ष करण्यात आले आहे. पंतसोबतच सगळ्यांच्या नजरा शमीवरही होत्या. रणजी ट्रॉफी दरम्यान शमीला निवड समितीचे प्रमुख आर. पी. सिंग यांच्यासोबत पाहिले गेले होते, त्यानंतर त्याच्या निवडीबाबत चर्चा रंगली होती.

याआधी शमीला संघाबाहेर ठेवण्याचे कारण त्याची फिटनेस सांगण्यात आले होते. सध्या शमी बंगाल संघाकडून रणजी ट्रॉफी खेळत आहे, जिथे त्याने उत्तराखंडविरुद्ध 7 आणि गुजरातविरुद्ध 8 विकेट्स घेतल्या आहेत. फक्त दोन सामन्यांत त्याने 15 बळी घेतल्यामुळे चाहत्यांना वाटत होते की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शमीला पुन्हा स्थान मिळेल, पण तसं झालं नाही.

शमीच्या वगळण्यावर सोशल मीडियावर चाहत्यांनी गंभीर-अगरकर यांच्यावर टीका केली आहे. एका चाहत्याने लिहिले, “हे मॅनेजमेंट मोठ्या वयाच्या खेळाडूंना दुर्लक्ष करत आहे. उदाहरण समोर आहेत, रोहित शर्मा, विराट कोहली, अश्विन आणि आता शमी. दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली की, दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात शमीला जागा नाही! मोहम्मद शमीसारखा खेळाडू बनणं अवघड आहे, तो याहून चांगल्या वागणुकीचा हकदार आहे.
तिसऱ्या चाहत्याने विचारलं की, शमी संघात का नाही? रणजी ट्रॉफी आणि इतर स्पर्धांमधील मेहनतीनंतरही त्याची फिटनेस समस्या आहे का? की भारतासाठी खेळण्याचं हे त्याचं शेवटचं पान ठरणार आहे?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा कसोटी संघ: शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), यशस्वी जयसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि आकाश दीप.

Comments are closed.