भारतीय वंशाचे ममदानी न्यूयॉर्कचे मेयर

भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे न्यूयॉर्कचे नवे महापौर झाले आहेत. ममदानी यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लिवा आणि अपक्ष उमेदवार अॅण्ड्रय़ूज कुओमो या दिग्गजांचा पराभव करत इतिहास रचला. अमेरिकेच्या सर्वात मोठय़ा शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान मिळवणारे ममदानी हे
पहिले दक्षिण आशियाई आणि पहिले मुस्लिम ठरले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे ही निवडणूक जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच ममदानी यांना तीव्र विरोध केला होता. ममदानी महापौर झाल्यास न्यूयॉर्कचा निधी थांबवण्याची धमकीही त्यांनी दिली होती. ममदानी यांनी मात्र सकारात्मक प्रचार करत मतदारांची मने जिंकली.

'आवाज करा, आवाज करा…'

बॉलीवूडमधील गाण्यांचा आधार घेऊन निवडणुकीचा प्रचार करणाऱया ममदानी यांनी विजयाचे सेलिब्रेशनही त्याच स्टाईलमध्ये केले. सेलिब्रेशनसाठी सहकुटुंब स्टेजवर असताना ‘धूम मचा ले धूम…’ हे गाणे वाजत होते.

ट्रम्प यांचा शेवटपर्यंत आटापिटा

ममदानी यांना पराभूत करण्यासाठी ट्रम्प अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला, मात्र ममदानी यांच्या लोकप्रियतेपुढे ही रणनीती अपयशी ठरली.

गजाला हाशमी वर्जिनियाच्या उपमहापौरपदी

ममदानी यांच्याबरोबरच हिंदुस्थानी वंशाच्या गजाला हाशमी यांनी वर्जिनिया शहराच्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. हाशमी यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला होता. वयाच्या पाचव्या वर्षी कुटुंबीयांसह त्या अमेरिकेत गेल्या आणि तिथेच स्थायिक झाल्या.

विजयी भाषणात नेहरूंचा उल्लेख

विजयानंतर केलेल्या भाषणात ममदानी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ऐतिहासिक वाक्यांचा उल्लेख केला. ‘जुने सोडून नव्याकडे जाण्याचा असा क्षण इतिहासात क्वचितच येतो. हा तो क्षण असतो जेव्हा एका युगाचा अंत होतो, जेव्हा अनेक वर्षे दबल्या गेलेल्या ‘आतल्या आवाजाला’ अभिव्यक्त होण्याची संधी मिळते,’ असे ममदानी म्हणाले.

Comments are closed.