पीएम मोदी-विश्वचषक विजेत्या संघाची भेट
हास्यविनोदांच्या वातावरणात अभिनंदनाचा वर्षाव
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी विश्वविजेत्या महिला क्रीकेट संघाची भेट घेतली आहे. त्यांनी या संघाला बुधवारी आपल्या निवासस्थानी येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार संध्याकाळी या संघातील सर्व महिला खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी आल्या होत्या. संघाचे प्रशिक्षकही त्यांच्यासमवेत होते. भारतीय महिला क्रीकेट संघाने अनेक बलाढ्या महिला संघांवर मात करत यावेळचा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे साऱ्या देशातून त्यांच्यावर कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर आता या सर्व महिला खेळाडू त्यांच्या त्यांच्या घरी जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर महिला खेळाडूंनी त्यांचे अनुभव आणि या स्पर्धेतील रोमांचक क्षण यांची माहिती त्यांना दिली. साधारणत: दोन तास हा संघ त्यांच्या निवासस्थानी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन केले आणि त्यांना भविष्यकाळातील उज्ज्वल कामगिरीविषयी शुभेच्छा दिल्या. खेळाडूंनीही त्यांचे मनापासून आभार मानले.
विशेष ‘जर्सी’ची दिली भेट
विश्वचषक विजेत्या भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक विषेश भेट आणली होती. ही एक विशेष प्रकारची ‘जर्सी’ असून तिच्यावर ‘नमो’ असा शब्द ठळकपणे मुद्रित केलेला आहे. ही भेट मिळाल्याने आपल्याला अत्यानंद झाला असून ती मी जपून ठेवणार आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खेळाडू यांच्यात मनसोक्त गप्पा आणि हास्यविनोद झाल्याचेही वृत्त आहे.
विशेष विमानाने दिल्लीला
भारतीय महिला संघातील सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी मंगळवारीच दिल्लीला जाण्यासाठी मुंबईहून प्रायाण केले होते. त्यांच्यासाठी विशेष चार्टर्ड विमानाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांचे दिल्लीत आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने क्रीकेट रसिक विमानतळावर जमा झाले होते. मुंबईतही त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर असंख्य क्रीकेटप्रेमी जमा झाले होते. खेळाडूंनीही हात हालवून त्यांना अभिवादन केले.
Comments are closed.