बिहारमध्ये आज 121 जागांसाठी मतदान होत आहे

विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा : 1,314 उमेदवार रिंगणार, यंत्रणा सज्ज

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी संध्याकाळी संपल्यानंतर आता गुरुवारी मतदान होत आहे. 18 जिह्यांमधील 121 जागांसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मधेपुरा, सहरसा, दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपाळगंज, सिवान, सारण, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा, पाटणा, भोजपूर आणि बक्सर या जिह्यांमध्ये मतदान होणार आहे. या टप्प्यात 1,314 उमेदवार निवडणूक लढवत असून त्यात अनेक हाय-प्रोफाईल मतदारसंघांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी चोखपणे पूर्ण केली आहे. प्रशासकीय तयारीसोबतच सुरक्षा यंत्रणाही कडक करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी निवडणूक अधिकारी-कर्मचारी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये ईव्हीएमसह अन्य साहित्य घेऊन रवाना झाले. या टप्प्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील 16 मंत्र्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. यामध्ये भाजप कोट्यातील 11 आणि जेडीयू कोट्यातील 5 मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपच्या मंत्र्यांमध्ये मंगल पांडे (सिवान), नितीन नवीन (बंकीपूर), सम्राट चौधरी (तारापूर), विजय कुमार सिन्हा (लखीसराय), जीवेश मिश्रा (जले), संजय सरावगी (दरभंगा अर्बन) आणि सुनील कुमार (बिहार शरीफ) यांचा समावेश आहे. जेडीयूच्या प्रमुख मंत्र्यांमध्ये विजय कुमार चौधरी (सराई रंजन), श्रवण कुमार (नालंदा), मदन साहनी (बहादुरपूर) आणि महेश्वर हजारी (कल्याणपूर) यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात एनडीएच्या वतीने जेडीयूचे 57, भाजपचे 48, लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) 13 आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे 2 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. महाआघाडीच्या वतीने आरजेडीचे 71, काँग्रेसचे 24 आणि डाव्या पक्षांचे 14 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. याशिवाय, विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) प्रत्येकी सहा जागांवर, सीपीएम तीन आणि भारतीय समावेशक पक्ष (आयआयपी) दोन जागांवर निवडणूक लढवत आहेत. प्रशांत किशोर यांच्या जनसूराज पक्षानेही या टप्प्यात तब्बल 118 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.

बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तारापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना आरजेडीच्या अरुण कुमार शाह यांच्याशी थेट होणार आहे. जनसूराज पक्षाचे संतोष कुमार सिंह आणि तेज प्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दलाचे सुखदेव यादव हे देखील आपले नशीब आजमावत आहेत.

राजदसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जाणाऱ्या राघोपूर मतदारसंघातही पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. राघोपूरमधून यावेळी राजद नेते तेजस्वी यादव तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तेजस्वी यांनी 2015 आणि 2020 मध्ये येथे भाजपचे सतीश कुमार यांचा पराभव केला होता. आता एनडीएच्या बाजूने सतीश यादव यांचे आव्हान त्यांच्यासमोर असून जनसूराज पार्टीचे चंचल कुमार हेदेखील राघोपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Comments are closed.