पाकिस्तानकडून भारतीय हिंदू यात्रेकरूंचा छळ

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पाकिस्तानातील नानक साहेब गुरुद्वाराला भेट देण्याचे रितसर अनुमतीपत्र आणि इतर कागदपत्र हाती असूनही भारतातील अनेक हिंदू यात्रेकरूंना पाकिस्तानच्या सीमेवरून परत पाठविण्यात आले आहे. या हिंदू यात्रेकरूंनी यासंबंधी आक्षेप घेतल्यानंतरही त्यांना दर्शनासाठी जाऊ देण्यात आलेले नाही. पाकिस्तानकडून अशा प्रकारे हिंदू यात्रेकरूंना त्रास देण्यात येत आहे, अशी माहिती उघड झाली आहे.

पाकिस्तानच्या भारतातील उच्चायोगाने भारतातील 2 हजार 100 यात्रेकरूंना पाकिस्तानातील गुरुद्वारांना भेट देण्यासाठी व्हिसा दिला आहे. त्यांच्यात काही हिंदू यात्रेकरूंचाही समावेश आहे. मात्र, या हिंदू यात्रेकरूंनी पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर त्वरित त्यांना अडविण्यात आले. त्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांचा छळ करण्यात आला आणि त्यांना भारतात परत पाठविण्यात आले. तुम्ही शीख नाही. त्यामुळे तुम्हाला गुरुद्वारांच्या दर्शनाला जाता येणार नाही, अशी दरडावणी करण्यात आली, अशी तक्रार या हिंदू यात्रेकरूंनी भारतात परतल्यावर केली आहे.

गुरु नानक यांच्या जयंतीचा उत्सव

शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे प्रथम धर्मगुरु नानकदेव यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्षी अनेक शीख आणि हिंदू यात्रेकरू पाकिस्तानात जातात. कारण त्यांचे जन्मस्थान सध्याच्या पाकिस्तानात आहे. यासाठी पाकिस्तानकडून त्यांना व्हिसा देण्यात येतो. यावेळीही ही प्रक्रिया रितसर पार करण्यात आली. तथापि, पाकिस्तानने हिंदू यात्रेकरूंना वेगळे काढून त्यांना दर्शनापासून वंचित ठेवले. हा हिंदू आणि शीख यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याची टीका आता पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांवर केली जात आहे.

भारताकडून गंभीर दखल

पाकिस्तानच्या या तिरस्करणीय वागणुकीची गंभीर दखल भारताकडून घेण्यात आली आहे. पाकिस्तानात यात्रेसाठी गेलेले हे हिंदू सर्वसामान्य नागरिक होते. ते कोणी राजकीय नेते किंवा कार्यकर्ते नव्हते. तसेच त्यांच्याकडे पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून देण्यात आलेली रितसर कागदपत्रे होती. तरीही त्यांना अडविण्यात आले. यावरून पाकिस्तानची हिंदूंकडे पाहण्याची वृत्ती स्पष्ट होते. याची किंमत पाकिस्तानला भोगावी लागल्यावाचून राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

Comments are closed.