Baby Ear Piercing: बाळाचे कान कधी टोचावे? ते करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं
आपल्याकडे लहानपणी प्रत्येकाचे कान टोचले जातात. कारण हिंदू धर्मातील १६ संस्कारांपैकी एक म्हणजे कर्ण-वेध संस्कार आहेत. त्यामुळे भारतात केवळ मुलीच नव्हे तर मुलांचेही कान टोचण्याची प्रथा आहे. मात्र ही प्रक्रिया त्रासदायक असते. यामुळे कधीकधी मुलांना खूप वेदना होतात. मग अशावेळी मुलांचे कान कधी टोचावे? कान टोचण्यासाठी योग्य वय काय? हा प्रश्न पडतो. याशिवाय मुलांचे कान टोचण्यापूर्वी नकळत काही चुका होतात. या चुका टाळण्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे.
बाळाचे कान कधी टोचावे?
बाळाचे कान टोचण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. ॲक्युपंक्चर थेअरपीप्रमाणे कान टोचण्यामुळे विविध आजारांचा धोका कमी होतो. शिवाय लहानपणी मुलांची त्वचा संवेदनशील असते ज्यामुळे कान पटकन टोचले जातात आणि त्यांना कमी वेदना होतात. हा विधी सहसा बाळ जन्माला आल्यानंतर महिन्याच्या आत केला जातो. पण बालरोगतज्ञांच्या मते, लहान मुलांचे कान टोचण्यासाठी ३ ते ४ वर्षे वय योग्य ठरतं. कारण या काळात मुलांची प्रतिकारशक्ती विकसित झालेली असते.
ही काळजी घ्या
मुलांचे कान टोचण्यापूर्वी मूल पूर्णपणे निरोगी असणं गरजेचं आहे. यावेळी मुलाला ताप किंवा कोणत्याही प्रकारचा संसर्ग झालेला नसावा.
तसेच बाळ खूप लहान असताना त्याचे कान टोचू नयेत. कारण तेव्हा बाळाची रोगप्रतिकारक शक्ती तितकीशी विकसित झालेली नसते, यामुळे संसर्गाचा धोका असतो.
मुलांचे कान टोचण्यापूर्वी ३० मिनिटे कानाजवळ क्रीम आणि बर्फ लावा.
तसेच कान टोचल्यावर मुलांना नेहमी सर्जिकल स्टील आणि सोन्याचेच कानातले घालावे. तसेच एकदा घातल्यावर कानातले सहा आठवड्यापर्यंत बदलू नये.
पूर्वी सोनाराकडून कान टोचले जायचे मात्र आता बालरोगतज्ज्ञ डॉक्टरकडून कान टोचणी केली जात आहे. शिवाय बाळाचे नेहमी अशा ठिकाणी टोचावे जिथे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.
कान टोचल्यानंतर लालसरपणा, सूज येणे, किंवा जास्त वेदना यासारख्या संसर्गाची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
Comments are closed.