शेतकऱ्यांना फुकट कितीकाळ देणार म्हणणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या पुत्राला मात्र फुकट जमीन मिळणार का? – वडेट्टीवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे डायरेक्टर असलेल्या अमीडीया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीने तब्बल १८०० कोटी रुपये बाजारभाव असलेली महार वतनाची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतली. सरकारच्या नावावर असलेली जमीन कशी काय खरेदी केली? यात घोटाळा झाला आहे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलासाठी फाईल रॉकेटच्या वेगाने फिरली. अमेडिया कंपनीला आयटी पार्क आणि डेटा सेंटरसाठी सरकारच्या मालकीची जमीन मिळाली कशी? आणि अवघ्या काही तासात उद्योग संचालनालयाने यासाठी २१ कोटीची स्टॅम्प ड्युटी माफ पण केली? एकीकडे अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना फुकटचे सल्ले देतात कर्जमाफी कशी करणार, कितीवेळा फुकट मिळणार? मग आता राज्याच्या तिजोरीचे नुकसान करून त्यांच्या मुलाला कसे काय टॅक्स माफ होतो? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

एकीकडे तिजोरीत खडखडाट आहे अस सरकार सांगते आणि दुसरीकडे असे जमिनीत घोटाळे करून महसूल बुडवला जातो. पुण्यात अशा जमिनीच्या व्यवहारातून एक लाख कोटींचा घोटाळा झाला आहे, असे घोटाळे शोधले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी पण करता येईल आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी भरघोस मदत देखील करता येईल असे वडेट्टीवर म्हणाले.

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीचा व्यवहार रद्द करून याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणी जी जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

मुलाच्या नावाने पुण्यात 40 एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा! काँग्रेसची मागणी

पुण्यातील प्रकरण समोर आल्यावर आता मुख्यमंत्री कारवाई करणार का? पारदर्शक पद्धतीने कारभार करतो अस सांगणारे देवाभाऊ सत्ता टिकवण्यासाठी दुर्लक्ष करणार की कारवाई करणार असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. घोटाळा करून असा काही घोटाळा केला नाही असे पार्थ पवार आता वरून बोलतात. म्हणूनच या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण – तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन; मुख्यमंत्री म्हणाले, प्रकरण गंभीर

Comments are closed.