वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल ‘टाटा’कडून टीम इंडियाचं खास सन्मान; प्रत्येक खेळाडूंना मिळणार…

भारताच्या महिला क्रिकेट संघाने 2025 महिला विश्वचषक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच महिला विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघाने प्रभावी खेळ सादर करत देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले.

या भव्य विजयानंतर भारतीय संघावर सन्मान आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आयसीसीने संघाला 39.55 कोटी रुपयांची पारितोषिक रक्कम जाहीर केली असून बीसीसीआयनेही भारतीय महिला संघासाठी 51 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या पारितोषिकांनंतर आता टाटा मोटर्सनेही संघाच्या गौरवात भर घालत एक विशेष घोषणा केली आहे.

टाटा मोटर्स प्रत्येक महिला क्रिकेटपटूला नवी टाटा सिएरा SUV भेट देणार आहे. सुमारे 12.5 लाख रुपयांपासून सुरू होणारी ही एसयूव्ही कंपनीची आगामी महत्त्वाची कार मानली जाते. टाटा मोटर्सचे सीईओ शैलेंद्र चंद्र यांनी सांगितले की, “भारतीय महिला संघाने जिद्द, धैर्य आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर देशाचा अभिमान उंचावला आहे. त्यांचा हा ऐतिहासिक प्रवास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.”

विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान खेळाडूंनी पंतप्रधानांना ‘NaMo 1’ अशी खास जर्सी भेट दिली. पंतप्रधानांनीही संघातील सर्व खेळाडूंचे कौतुक करत त्यांच्या कामगिरीला सलाम केला.

Comments are closed.