भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाचे तिबार मतदान, चारकोपमध्येही मतचोरी

लोकसभा आणि विधानसभेत भाजपने कशी मतचोरी केली हे आता उघड होऊ लागले आहे. चारकोप विधानसभेच्या मतदार यादीत भाजप वॉर्ड अध्यक्ष संतोष जाधव यांचे तीन वेळा नाव असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे नाव असलेल्या सर्व ठिकाणी त्यांनी मतदान केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात शिवसेनेने चारकोप विधानसभेच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे.

चारकोप विधानसभा मतदारसंघाच्या यादी भाग क्रमांक 106 मधील मानव सेवा संघ, पाटील नगर, बंदर पाखाडी या पत्यावर अनुक्रमांक 298 आणि अनुक्रमांक 336 वर संतोष खंडू जाधव यांच्या नावाची नोंद आहे. याच मतदारसंघाच्या यादी भाग क्रमांक 96 मध्ये सुंदरनगर चाळ, महावीर नगरसमोर, बंदर पाखाडी रोड या पत्त्यावर मतदार यादीत अनुक्रमांक 429 वर संतोष खंडू जाधव यांच्या नावाची नोंद असल्याचे आढळून आले आहे. संतोष जाधव हे भाजपचे वॉर्ड क्रमांक 20 चे अध्यक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीत या तीनही ठिकाणी त्यांनी मतदान केल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येत आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

तीन मतदान आयडी

भाजपचे वॉर्ड अध्यक्ष असणाऱ्या संतोष जाधव यांच्याकडे तीन मतदार ओळखपत्र असल्याचे मतदार यादीतील नोंदीवरून दिसून येत आहे.  यादी भाग क्रमांक 106 मधील नावावर DWJ4424347 आणि AVE7089063  या क्रमांकाचे ओळखपत्र आहे. तर यादी भाग क्रमांक 62 मधील नावाच्या नोंदीवर AVE2513190 या क्रमांकाचे ओळखपत्र असल्याचे दिसून येत आहे. संतोष जाधव हे वॉर्ड क्रमांक 20 चे भाजप अध्यक्ष आहेत. मात्र ते वास्तव्यास वॉर्ड क्रमांक 21 मध्ये असल्याचे रवींद्र मरये यांनी सांगितले.

शिवसेनेकडून तक्रार

चारकोपच्या यादीतील गंभीर चुकांबाबत शिवसेनेने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. महापालिका निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या यादीची तपासणी करून दुबार, मयत मतदारांची नावे वगळावी, अशी मागणी विभागप्रमुख संतोष राणे, उपविभागप्रमुख शाम मोरे, शाखाप्रमुख रवींद्र मर्ये यांनी केली आहे

Comments are closed.