सहकार आणि पणनमंत्र्यांमध्ये वाद, सरकारी जीआरनेच दिले संकेत

महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये अधिकारांवरून वाद निर्माण झाल्याचे समोर येत आहे. सहकारमंत्री आणि पणनमंत्री यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे संकेत आज शासनाच्या एका जीआरने दिले. पणनमंत्री कोणत्या खात्याचे काम पाहणार याबद्दल त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अवर सचिव माधवी शिंदे यांच्या सहीने हा जीआर आज काढण्यात आला. सध्या अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे सहकारमंत्री आहेत तर भाजपचे जयकुमार रावल यांच्याकडे पणन खाते आहे. भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग खाते आहे. पणन विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या पणन सहकार संस्थांचे वैधानिक कामकाज पणन विभागामार्फत पणनमंत्र्यांच्या मान्यतेने करणे आवश्यक आहे, असे जीआरमध्ये
म्हटले आहे.
पणन विभागाच्या अखत्यारित असलेल्या ग्राहक सहकारी संस्था, सहकारी खरेदी-विक्री संघ, जिनिंग व प्रेसिंग संस्था, सहकारी प्रक्रिया संस्था, फळे व भाजीपाला व इतर सर्व पणन प्रक्रिया सहकारी संस्था, तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 व नियम 1961 अन्वये स्थापन पणन सहकारी संस्था या सर्व संस्थांशी संबंधित वैधानिक कामकाज पणन विभागामार्फत पणनमंत्री यांच्या मान्यतेने करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे जीआरमध्ये नमूद आहे. पणन खात्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचा जीआर काढण्यात आल्याने हा दोन मंत्र्यांमधील वादाचा परिणाम असावा असे बोलले जात आहे.

Comments are closed.