राहुल गांधींचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत.

वृत्तसंस्थेकडून परीक्षण, संपूर्ण महिती केली प्रसिद्ध

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

हरियाणा राज्यात 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ‘मतचोरी’ झाली असून निवडणूक फिरवली गेली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित होता. पण मतचोरीमुळे भारतीय जनता पक्षाचा विजय झाला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तथापि, एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने गांधी यांच्या आरोपांच्या आधारे प्रत्यक्ष परीक्षण केले असता हे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

एका ब्राझिलियन मॉडेलच्या छायाचित्रावर अस्तित्वात नसलेल्या 22 महिनांनी मतदान केले आहे. हे मतदान स्वीटी, सरस्वती, रश्मी, विमला अशा नावांनी झाले आहे, असा राहुल गांधी यांचा मुख्य आरोप होता. तथापि, या वृत्तसंस्थेने या महिलांची त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. तेव्हा, त्यांनी आपण स्वत: मतदान केल्याचे या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींकडे स्पष्ट केले. आमच्याकडे वैध मतदान ओळखपत्र असून आम्ही मतदान केले तेव्हा कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. कोणीही आक्षेप घेतला नाही. आम्ही ‘बनावट’ मतदार नाही. आम्ही वैध मतदार असून अनेक निवडणुकांमध्ये मतदान केले आहे, असे असे प्रतिपादन या महिलांनी केले. त्यामुळे या मुख्य आरोपात तथ्य नसल्याचे दिसून येत आहे.

होडाल मतदारसंघाचा प्रश्न

राहुल गांधी यांचा दुसरा आरोप हरियाणातील होडाल मतदासंघासंबंधी होता. या मतदारसंघात 66 मतदारांची नावे भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरात दाखविण्यात आलेली आहेत. हे बनावट मतदार आहेत, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला होता. या वृत्तसंस्थेने या घराला भेट दिली आणि भारतीय जनता पक्षाच्या या स्थानिक नेत्याशीही चर्चा केली. त्यावेळ हे सर्व मतदार तेथे खरोखरच रहात असल्याचे दिसून आले. हे सर्व मतदार या नेत्याचे दूरचे आणि जवळचे नातेवाईक आहेत. त्यांच्यापैकी कोणीही बनावट मतदार नाही. हे सर्व एका मोठ्या भूखंडात वास्तव्य करीत आहेत आणि या भूखंडाचा क्रमांक या सर्व मतदारांनी आपला पत्ता म्हणून दिलेला आहे. या सर्वांकडे वैध मतदार ओळखपत्र आहे, हे स्पष्ट झाले. त्यामुळे हा आरोपही निराधार असल्याचे दिसून येत आहे.

चार पिढ्यांचे एकत्र वास्तव्य

या वृत्तसंस्थेने भारतीय जनता पक्षाच्या या स्थानिक नेत्याशी चर्चा केली. आम्ही चार पिढ्यांचे नातेवाईक येथे एकत्र रहात आहोत. अनेक वर्षांपासून आम्ही येथे रहात असून अनेकदा मतदान आमच्यापैकी प्रत्येकाने केले आहे. त्यामुळे आम्ही वैध मतदार असून आमच्यापैकी कोणीही बनावट नाही. या संबंधातील सर्व आरोप खोटे असून चुकीच्या माहितीवर आधारित आहेत, असे या नेत्याने स्पष्ट केले.

501 मतदारांची नोंद

राहुल गांधी यांचा तिसरा आरोप घर क्रमांक 265 संबंधी होता. या घरात 501 मतदार नोंद झालेले आहेत. हा बनावट प्रकार आहे, असे त्यांचे म्हणणे होते. तथापि, या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींनी या घराला प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा खरे चित्र स्पष्ट झाले. या कुटुंबातील एका महिला सदस्याने स्थिती स्पष्ट केली. आमच्या घरात 8 सदस्य आहेत. आमच्या घराण्याची 30 एकर भूमी होती. त्या भूमीत आम्ही प्लॉट पाडून ते टप्प्याटप्प्याने विकले. त्यामुळे या मुख्य भूमीच्या क्रमांकावर अनेक नावे मतदारसूचीत दिसून येतात. तथापि, हे आमच्या कुटुंबातील मतदार नाहीत. ज्यांनी आमच्याकडून भूखंड विकत घेतले आहेत, त्यांची ती नावे आहेत. त्यांनी भूखंड क्रमांक जो दिला आहे, तो या साऱ्या वेगवेगळ्या कुटुंबातील मतदारांचा आहे. त्यामुळे ही एकाच कुटुंबातील माणसे नाहीत, हे या महिलेने स्पष्ट केले. या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींनी या वेगवेगळ्या कुटुंबांमधील सदस्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनीही हीच परिस्थिती स्पष्ट करुन आरोप नाकारले आहेत. अशा प्रकारे गांधी यांचे आरोप निराधार असल्याचे या वृत्तसंस्थेचे स्पष्ट म्हणणे आहे.

प्रमुख तीनही आरोप तथ्यहीन

  • गांधी यांचे प्रमुख तीनही आरोप निराधार असल्याचा वृत्तसंस्थेचा निष्कर्ष
  • जे मतदार बनावट असल्याचा आरोप होता ते मतदार आहेत अस्तित्वात
  • वृत्तसंस्थेने घेतली अनेक आरोपित मतदारांची प्रत्यक्ष भेट, आरोप निराधार

Comments are closed.