जिथं ऋषभ पंत फ्लॉप ठरला; तिथं ध्रुव जुरेलनं ठोकलं शतक! दक्षिण आफ्रिका मालिकेआधी पलटणार खेळ


भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ, दुसरी अनधिकृत कसोटी : बंगळुरूमध्ये गुरुवारपासून सुरू झालेल्या इंडिया ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यातील दुसऱ्या अनधिकृत कसोटीत पहिल्याच दिवशी भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. टॉप ऑर्डर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. अशा परिस्थितीत 86 धावांपर्यंतच अर्धा संघ माघारी परतला. त्यानंतर 126 धावांवर सात गडी बाद झाले. मात्र, अखेरच्या सत्रात ध्रुव जुरेलच्या नाबाद 132 धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताचा डाव 255 धावांपर्यंत पोहोचला.

इंडिया ‘अ’साठी ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव यांनी आठव्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. कुलदीपने 88 चेंडूत 20 धावा करत जुरेलला साथ दिली. त्यानंतर मोहम्‍मद सिराजने 31 चेंडूत 15 धावा करत 9व्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. अखेरीस पहिल्या दिवसाखेरीस भारत 255 धावांवर ऑलआऊट झाला.

राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत आणि देवदत्त पडिक्कल फेल

टीम इंडियाचे अनुभवी खेळाडू के.एल. राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत आणि देवदत्त पडिक्कल यांचा फलंदाजीत काहीच प्रभाव दिसला नाही. राहुल 19, सुदर्शन 17, पडिक्कल 5 आणि पंत 24 धावा करून बाद झाले. तर अभिमन्यू इस्‍वरन तर खातेही उघडू शकला नाही. या परिस्थितीत ध्रुव जुरेलने संघाची लाज वाचवली. त्याने 175 चेंडूत 132 नाबाद धावा ठोकल्या, ज्यात 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या शानदार खेळीने कोच गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांनाही त्याची क्षमतावान फलंदाज म्हणून जाणीव करून दिली.

सात डावांत तिसरा शतक, दक्षिण आफ्रिका मालिकेत संधी मिळणार?

जुरेलने वान वुरेनच्या चेंडूवर एक धाव घेत प्रथम श्रेणी कारकिर्दीतील चौथा शतक पूर्ण केलं. गेल्या सात डावांतील हे त्याचं तिसर शतक आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्ध लखनौमध्ये आणि वेस्ट इंडीजविरुद्ध अहमदाबादमध्ये शतक ठोकले होते. ऋषभ पंत दुखापतीमुळे बाहेर असताना जुरेलनेच भारतीय संघासाठी यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती आणि वेस्ट इंडीजविरुद्ध उत्कृष्ट शतक झळकावले होते. मात्र आता पंत पुनरागमनानंतर जुरेलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागेल, अशी शक्यता आहे. तरीही, त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीने तो केवळ यष्टीरक्षक नव्हे तर एक सक्षम फलंदाज म्हणूनही स्वतःला सिद्ध करत आहे.

हे ही वाचा –

IND vs PAK Live Hong Kong Sixes 2025 : आज भारत-पाकिस्तान ‘हायव्होल्टेज’ सामना, कोण मारणार बाजी, TV-मोबाईलवर कुठे पाहाल थेट LIVE? जाणून घ्या एका क्लिकवर

आणखी वाचा

Comments are closed.