Sleep Divorce घेण्यात भारत टॉपवर; एकमेकांपासून का वेगळं झोपत आहेत नवरा-बायको?

झोप ही निरोगी शरीरासाठी आवश्यक असते. प्रत्येकाने ७-८ तासांची झोप घेणं आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. पण झोपण्याच्या अनेकांच्या सवयी या विरुद्ध असतात. काही जण झोपताना घोरतात, जास्त हालचाल करतात तर काहींना शांत झोपेची सवय असते. त्यामुळेच आजकाल कपल्समध्ये स्लीप डिव्होर्स नावाचा ट्रेंड वाढत चालला आहे. आता तुम्हाला डिव्होर्स हा शब्द ऐकून असं वाटलं असेल की यामुळे एखाद्या जोडप्याच्या आयुष्यात दुरावा निर्माण होतो. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की स्लीप डिव्होर्समुळे जोडप्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होत असल्याचं म्हंटलं जातं. मग हे स्लीप डिव्होर्स नेमकं आहे तरी काय? जाणून घेऊया.. ( What is Sleep Divorce And How Does it Affects Husband- Wife relationship ? )

स्लीप डिव्होर्स म्हणजे काय? ( स्लीप घटस्फोट म्हणजे काय ? )
या ट्रेंडमध्ये लोक एकाच घरात राहतात; परंतु वेगवेगळ्या पलंगावर किंवा वेगवेगळ्या खोलीत झोपतात. बहुतांश वेळा एका पार्टनरची नाइट शिफ्ट, घोरण्याची सवय किंवा रात्री उशीरापर्यंत मोबाईलचा वापर करत राहणे यासारख्या सवयीमुळे दुसऱ्या पार्टनरची झोप मोड होते. मग एकमेकांच्या विरुद्ध झोपेच्या सवयीमुळे जोडप्यांमध्ये भांडणं होतात. हे टाळण्यासाठी आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लोक हा पर्याय निवडताना दिसत आहेत. झोपेच्या अभावामुळे मानसिक त्रास आणि गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे स्लीप डिव्होर्सच्या ट्रेंडमुळे झोपेच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जोडप्यांमध्ये हा ट्रेंड वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

भारत आघाडीवर
स्लीप डिव्होर्सची ही संकल्पना अमेरिकेसारख्या देशांमध्ये सुरू झाली. मात्र आता भारतात ७८ टक्के कपल्सने स्लिप डिव्होर्स घेतल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. म्हणजेच स्लिप डिव्होर्स घेण्यात भारत सध्या आघाडीवर आहे. त्यानंतर ६७ टक्क्यांसह चीन आणि ६५ टक्क्यांसह दक्षिण कोरियाचा नंबर लागतो. याशिवाय स्लीप डिव्होर्स घेतलेल्या लोकांना ५३ टक्के चांगली झोप लागत असल्याचंही एका अभ्यासातून समोर आलं आहे.

हेही महत्त्वाचे
नात्यात स्लीप डिव्होर्समुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि आरोग्यासाठीही फायदा होतो. पण कधीकधी त्याचा नात्यावर नकारात्मक परिणाम होतो तर कधीकधी आणखीनच जवळीक वाढते.

स्लीप डिव्होर्सचे सकारात्मक परिणाम

  • झोपेची गुणवत्ता सुधारते, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
  • झोपेमुळे मेंदूचे कार्य सुधारते, विचार करण्याची क्षमताही वाढते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
  • चांगली झोप झाल्यावर माणूस सकारात्मक आणि आनंदी असतो. त्यामुळे नात्यात संवाद वाढतो. कपल एकमेकांना समजून घ्यायला लागतात.

स्लीप डिव्होर्सचे नकारात्मक परिणाम

  • एकत्र असूनही वेगळे झोपल्यामुळे नात्यात भावनिक अंतर वाढू शकतं.
  • आजकालच्या जीवनशैलीत रात्रीच एकमेकांना वेळ देणं शक्य होतं. त्यामुळे नातं अधिक मजबूत होतं. पण स्लीप डिव्होर्समुळे कमी वेळ एकत्र घालवला जातो.
  • नात्यात असुरक्षिततेची भावना जाणवू शकते.
  • वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपणाऱ्या जोडप्यांच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम कमी होतं. यामुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होतात.

Comments are closed.