ऊसदरासाठी शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे सुरू

चार दिवसांपूर्वी ऊसदरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर आक्रमक झालेल्या जिह्यातील शेतकरी संघटनांनी इशारा देऊनही प्रशासनाकडून गांभीर्य दाखविण्यात आले नसल्याने कोल्हापुरातील प्रादेशिक साखर संचालक कार्यालयासमोर आजपासून विविध शेतकरी संघटनांकडून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
मागील ऊसगळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन 200 रुपये आणि चालू हंगामासाठी चार हजार रुपये दर मिळावा, अशी जिह्यातील शेतकरी संघटनांनी मागणी केली आहे. याबाबत गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार, शेतकरी संघटनांची बैठक झाली. त्यामध्ये कोणताही निर्णय झाला नाही. त्यानंतर साखर सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला, तर काल मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांडय़ा फेकण्याचा प्रकार झाला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी घुसून आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
एवढे करूनही ऊसदराबाबत मागणी मान्य न झाल्याने, जय शिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजी माने, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्यासह शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटना आदी नऊ संघटनांनी आजपासून येथील साखर सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Comments are closed.