दिव्यानंतर नौपाडा, मानपाडा रडारवर; साई अंजुमन आणि साई दर्शन इमारतीवर पडणार हातोडा, उच्च न्यायालयाचे आदेश

उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर दिव्यातील सात बेकायदा इमारती रिकाम्या करून त्या जमीनदोस्त करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यातच आता हाय कोर्टाच्या आदेशाने दिव्यानंतर नौपाडा आणि मानपाडा प्रभाग समिती हद्दीतील बेकायदा इमारती रडारवर आल्या आहेत. नौपाडा-कोपरी प्रभाग समिती हद्दीतील साई अंजुमन आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील साई दर्शन या दोन बेकायदा इमारतींवर हातोडा चालवण्यात येणार आहे. दरम्यान, दिव्यातील २५० कुटुंबांपाठोपाठ आता ठाणे शहरातील १०४ कुटुंबांचा संसार रस्त्यावर येणार आहे.

ठाण्यातील बेकायदा बांधकामांकडे कानाडोळा करणाऱ्या ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाकडून वारंवार झापले जात आहे. त्यामुळे झोपलेल्या प्रशासनाने बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. दिव्यात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा इमारती पडण्याची जोरदार मोहीम सुरू असून दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा या मोहिमेला वेग आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानेच दिव्याच्या डायघरमधील सात इमारती रिकाम्या करून पालिकेने या सर्व इमारती आता पडायला सुरुवात केली आहे. या इमारती रिकाम्या करताना पालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आता दिव्यानंतर लवकरच पालिकेचा मोर्चा हा ठाण्यातील दोन मोठ्या बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यासाठी वळणार आहे.

प्रशासनाविरोधात अवमान याचिका

नौपाडा प्रभाग समिती हद्दीत साई अंजुमन ही तळ अधिक ७ मजल्यांची बेकायदा इमारत आहे. या इमारतीमध्ये ४८ कुटुंबे वास्तव्यास आहेत. या बेकायदा इमारतीबाबत गुलाम रहमान जिलानी यांनी न्यायाल यात याचिका दाखल केली होती. इमारत तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र तरीही पालिकेच्या वतीने कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर यासंदर्भात न्यायालयाचा आदेश न पाळल्यामुळे अवमान याचिकादेखील दाखल करण्यात आली होती.

कुटुंबावर बेघर होण्याची वेळ

माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील साई दर्शन ही अतिशय मोठी सोसायटी असून या सोसायटीमध्ये तीन बेकायदा इमारती आहेत. एक इमारत तळ अधिक ७ मजल्यांची असून १९ रहिवाशी फ्लॅट तर ३ व्यावसायिक गाळे आहेत. दुसरी इमारत तळ अधिक ५ मजल्यांची असून यामध्ये १२ कुटुंबे वास्तव्यास आहेत, तर तिसरी इमारत तळ अधिक ५ मजल्यांची असून या इमारतीमध्ये २४ कुटुंबे वास्तव्यास आहेत. आत या सर्व कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे.

Comments are closed.