अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान, कृषी विभागाने लवकर पंचनामे पूर्ण करावे; शिवसेनेची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भात पिकाचे नुकसान झाले असून कृषी विभागामार्फत ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची मागणी केली जाते अशाच ठिकाणी पंचनामे केले जातात. मात्र अजून देखील जिल्ह्यातील भात पिकाचे क्षेत्र कापणी करायचे शिल्लक असून अनेक ठिकाणी पडलेल्या भाताला अंकुर येत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाला सरसकट नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्या. व तात्काळ हे पंचनामे पूर्ण करा अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी पडलेल्या भाताला अंकुर आलेल्या आलेल्या भात पिकाचा पेंढा जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्षात दाखवला. या भेटी प्रसंगी सावंत यांच्यासोबत जिल्ह्यातील अन्य शेतकरी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, हाती आलेले भात पीक पूर्णता नासाडी होत आले आहे. त्यातच पाऊस अद्यापही थांबण्याचे नाव घेत नसताना हे भात पीक वाया जाणार आहे. कृषी विभाग सरसकट पंचनामे न करता जी शेतकरी संपर्क साधून पंचनामा करण्याची मागणी करतात अशाच शेतकऱ्यांचे पंचनामे केली जातात. मात्र गावागावातून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊन देखील ते भात कापणी च्या कामात असल्याने त्यांना प्रशासकीय सोपस्कार करण्यासाठी तेवढा पुरेसा वेळ देखील नाही. भात कापणी झाल्यानंतर हे पंचनामे करताना आढेवेढे घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी सहाय्यकाने गावात जाऊन स्वतः शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संपर्क साधून हे पंचनामे करण्याबाबत तातडीने जिल्हा कृषी अधीक्षकांना आदेश द्या. अशी मागणी सावंत यांनी केली. तसेच सर्व शेतकरी नुकसान भरपाई साठी समाविष्ट झाले पाहिजेत कुठलाही शेतकरी वंचित राहता नये या दृष्टीने तातडीने प्रयत्न करा अशी देखील मागणी सावंत यांनी केली. तसेच यावेळी सतीश सावंत यांनी पडून कुजलेल्या भात पिकाला आलेले अंकुर असलेला भाताचा पेंढा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर दाखवत वस्तुस्थितीची कल्पना करून दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.