अखेर पुण्यातल्या त्या जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवार यांची माहिती; पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याबाबत मौन

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 1800 कोटी रुपये किमतीचा महार वतनाचा भूखंड अवघ्या 300 कोटींना खरेदी केला. केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरून 40 एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने पदरात पाडून घेतली होती. माध्यमांनी हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अखेर हा व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली असून याची चौकशी केली जाईल असेही अजित पवार म्हणाले. असे असले तरी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही यावर अजित पवार यांनी मौन साधले आहे.
आज माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, या व्यवहारात एकही पैसा दिलेला नाही. सरकारी जमिनीचा व्यवहार होत नाही. गेली 35 वर्ष मी राजकारणात आहे. अशा कुठल्याही प्रकारचे चुकीचे व्यवहार केले नाही. माझ्यावर कितीही आरोप झाले तरी ते सिद्ध झालेले नाही. या प्रकरणात दोन ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. या जमिनीचे रजिस्ट्रेशन कुणी केलं कसं झालं याचीही चौकशी केली जाईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Comments are closed.