विदेशी गुंतवणूकदारांचा एक निर्णय, शेअर बाजारात गुंतवणूकदारांना फटका, पावणे पाच लाख कोटी बुडाले
भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाल्यानंतर बाजारानं कमबॅकचा प्रयत्न केला. मात्र, आयटी, एफएमसीजी, फार्मा कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाली. त्याचवेळी फायनान्शिअल आणि मेटल शेअरच्या खरेदीमुळं बाजाराला आधार मिळाला. मात्र, निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली.या आठवड्यात शेअर बाजारात घसरण झाली याचं कारण विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर ची विक्री करणं हे आहे.

सेन्सेक्स 94.73 अंकांच्या घसरणीसह 83216.28 अंकांवर बंद झाला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 50 निर्देशांक 17.40 अंकांनी घसरुन 25492 अंकांवर बंद झाला. आठवड्याचा विचार केला तर दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाला.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चांगली चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. भारत दौऱ्याचं नियोजन करत असल्याचं देखील ते म्हणाले. मात्र, विदेशी गुंतवणूकदारांनी तीन ट्रेडिंग सत्रात 9845 कोटी रुपयांच्या भारतीय शेअरची विक्री केली.

भारतीय शेअर बाजारात 16 सेक्टोरल निर्देशांकापैकी 12 निर्देशांक घसरणीसह बंद झाले.ब्रॉडर बाजारात स्मॉल कॅफ शेअरमध्ये 1.7 टक्के घसरण झाली. मिड कॅप शेअरमध्ये कोणताही बदल झाला नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये या आठवड्यात 2.1 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. स्टेट बँक ऑफ इंडियाची दुसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरी त्यासाठी आधार ठरली.

वाहन क्षेत्रातील कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर 5.8 टक्क्यांनी वाढले. याशिवाय आरबीएल बँकेच्या शेअरमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. या आठवड्यात गुंतवणूकदारांचं पावणे पाच लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 31 ऑक्टोबरला 47,106,180 कोटी रुपये होते. ते 7 नोव्हेंबरला 46,631,517 कोटी रुपये झालं. म्हणजेच या आठवड्यात गुंतवणूकदारांचं 4 लाख 74 हजार 663 कोटी रुपयांचं नुकसान झालं.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशित : 07 नोव्हेंबर 2025 07:53 PM (IST)
व्यापार-उद्योग फोटो गॅलरी
आणखी पाहा
Comments are closed.