एसटी कामगारांचा पगार पुन्हा लटकवला!

‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ म्हणून ओळख असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा महायुती सरकारने पुन्हा एकदा अपेक्षाभंग केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेलाच देऊ, असे आश्वासन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. मात्र ऑक्टोबरच्या पगारासाठीची 7 नोव्हेंबरची डेडलाईन चुकली तरी पगाराचा पत्ता नाही. त्यामुळे राज्यभरातील 86 हजारांहून अधिक एसटी कर्मचारी आणि अधिकारी चिंतेत सापडले आहेत.

दिवाळीपूर्वी प्रलंबित थकीत देयकांच्या प्रश्नावर कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट आणि अग्रीम उचलव्यतिरिक्त काहीच कर्मचाऱ्यांच्या पदरी पडले नाही. त्यावरून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत असतानाच शुक्रवारी पगाराच्या दिवशी कर्मचाऱ्यांची घोर निराशा करण्यात आली. परिणामी, मुलांचा शैक्षणिक खर्च, घरखर्च, कर्जाचे हप्ते भरण्याची चिंता सतावत असते, अशी प्रतिक्रिया मुंबई सेंट्रल एसटी आगारातील काही कर्मचाऱ्यांनी दिली.

Comments are closed.