योग्य वेळी योग्य पाऊल उचलू

अणुपरीक्षणासंदर्भात राजनाथ सिंह यांचे विधान

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अणुपरीक्षणाच्या संदर्भात भारताची स्वत:ची स्वतंत्र भूमिका आहे. आम्ही देशाच्या सुरक्षेचा विचार करून यासंदर्भात योग्यवेळी योग्य पाऊल उचलणार आहोत, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब शुक्रवारी स्पष्ट केली. त्यांनी ‘सिंदूर अभियाना’संबंधीची माहितीही सविस्तरपणे या मुलाखतीत सादर केली आहे.

अणुतंत्रज्ञान आणि अण्वस्त्रे यांच्या संदर्भात कोणीही भारतावर कोणताही दबाव आणू शकत नाही. तसेच भारताला त्याचे धोरण सोडायला लावू शकणार नाही. आम्ही आमची धोरणे स्वतंत्रपणे आणि देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन निर्धारित करत आहोत. अणुपरीक्षणासंदर्भात सध्या जगात चर्चा होत आहे. काही देश गुप्तपणे अणुपरीक्षण करत आहेत, असेही प्रतिपादन केले जात आहे. अशास्थितीत भारत आपल्या स्वत:च्या हितरक्षणाच्या दृष्टीने योग्य असा निर्णय घेणार आहे. तो कोणता निर्णय असेल, हे सध्या स्पष्ट करण्याचे कारण नाही. परिस्थिती अभ्यासून त्या संबंधीचा निश्चित निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांचे खळबळजनक विधान

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच एक खळबळजनक विधान केले आहे. पाकिस्तान, चीन आणि उत्तर कोरिया हे देश अण्वस्त्रांची परीक्षणे गुप्तपणे करीत आहेत. अमेरिकाही मागे राहू शकत नाही, असे त्यांचे विधान होते. यामुळे जगभरात चर्चा होत आहे. पाकिस्तानच्या गुप्त अणुकार्यक्रमाविषयी ट्रम्प यांनी भाष्य केल्याने पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे. अशास्थितीत भारतात स्वत:च्या संरक्षणाच्या दृष्टीने कोणती भूमिका घेणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

‘सिंदूर अभियान’ अद्यापही

या मुलाखतीत राजनाथ सिंह यांनी ‘सिंदूर अभियाना’संबंधी सविस्तर माहिती दिली. या अभियानाच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला मोठा धडा शिकविला आहे. पाकिस्तानच्या वायुदलाची आणि त्याच्या संपर्क यंत्रणांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पाकिस्तान आपले अपयश लपविण्यासाठी भारतावर दुगाण्या झाडत असून खोटे आरोप करत आहे. फुशारकी मारत आहे. तथापि, त्याचा पोकळपणा साऱ्या जगासमोर उघडा झाला आहे, ही बाब त्यांनी स्पष्ट केली आहे.

आवश्यकता असल्यास पुन्हा

सिंदूर अभियान थांबलेले आहे. मात्र संपलेले नाही. पाकिस्ताने पुन्हा भारताची कळ काढल्यास ते पुन्हा हाती घेतले जाऊ शकते. पाकिस्तानच्या सेनाधिकाऱ्याने पुन्हा पुन्हा विनंती केल्याने भारताने पाकिस्तानचा शस्त्रसंधी प्रस्ताव स्वीकारला आहे. तो कोणाच्याही मध्यस्थीमुळे किंवा दबावामुळे नव्हे. मात्र, भारतीय सेनादले सज्ज असून आवश्यकता भासल्यास पुन्हा पाकिस्तानला धडा शिकविला जाईल. त्या देशाच्या हालचालींवर आमची सूक्ष्म दृष्टी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पाकिस्तानवर नाही विश्वास

पाकिस्तान हा विश्वास ठेवण्यालायक देश नाही. त्यामुळे त्यांच्याशी व्यवहार करताना आम्ही नेहमी सावध असतो. पाकिस्तानचे सेना प्रमुख असीम मुनिर यांनी पाकिस्तान सरकारवर दबाव आणून स्वत:ची पदोन्नती करून घेतली आहे. पाकिस्तान सरकार त्याच्या लष्कराच्या हातचे बाहुले आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणताही विश्वास टाकता येत नाही, किंवा त्याच्याशी चर्चाही करता येत नाही. पाकिस्तानने दहशतवादाचा पूर्ण त्याग केल्याखेरीज त्याच्याशी चर्चा न करण्याचा निर्णय भारताने याच कारणासाठी घेतला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही, ही भारताची प्रारंभापासूनची भूमिका आहे, अशा अर्थाचे स्पष्टीकरणही त्यांनी मुलाखतीत केले.

Comments are closed.