AUS vs IND: ब्रिस्बेनमध्ये रंगणार निर्णायक सामना, सूर्या ब्रिगेड मालिकेवर शिक्कामोर्तब करणार का?

सलग दोन सामने जिंकत टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भारताकडे मालिकेवर शिक्कामोर्तब करण्याची सुवर्णसंधी आहे. आधीच्या वनडे मालिकेत भारताला 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर टी 20 मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय नोंदवत मालिकेत आघाडी घेतली.

भारतावर त्या वेळी कमबॅक करण्याचं आव्हान होतं. हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संघाच्या रणनितीत बदल केले. तिसऱ्या सामन्यात तीन बदल करत खेळाडूंना नवी जबाबदारी देण्यात आली. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आणि भारताने तिसरा सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

यानंतर चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 168 धावांचे लक्ष्य उभे केले. भारतीय गोलंदाजांनी प्रभावी प्रदर्शन करत कांगारूंना 119 धावांवर रोखले. भारताने हा सामना 48 धावांनी जिंकत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आणि मालिका पराभव टाळला.

आता पाचवा आणि निर्णायक सामना ब्रिस्बेनच्या द गाबा मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताकडे विजयासह तीन मोठे कारनामे करण्याची संधी आहे. मालिका जिंकणे, सलग तिसरा विजय मिळवून हॅट्ट्रिक पूर्ण करणे आणि या मैदानावरील 2018 च्या टी 20 पराभवाची परतफेड करणे, अशी ही तिहेरी संधी आहे.

भारताने 2018 साली गाबा इथे पहिल्यांदा टी 20 सामना खेळत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारला होता. आता सात वर्षांनंतर त्याच मैदानावर बदला घेण्याची संधी भारतीय संघासमोर आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात भारत ‘हिशोब चुकते’ करत मालिकेवर नाव कोरतो का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Comments are closed.