ऋषभ पंतला पुन्हा दुखापत, वेदनेने विव्हळत मैदान सोडलं; नेमकं काय घडलं?, पाहा धडकी भरवणारा VIDEO


ऋषभ पंत जखमी : इंडिया-अ आणि दक्षिण आफ्रिका-अ यांच्यात सुरू असलेला दुसरा अनधिकृत कसोटी सामना रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. तिसऱ्या दिवशी के.एल. राहुल लवकरच बाद झाला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि आक्रमक अंदाजात खेळू लागला. मात्र त्याची खेळी फार काळ टिकली नाही. केवळ तीन चेंडूंवर तीन वेळा दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. या दरम्यान तो प्रचंड वेदनेत दिसत होता.

ऋषभ पंतला नेमकी कशी दुखापत झाली? (Rishabh Pant Retires Hurt)

इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंत नुकताच पुन्हा मैदानावर परतला होता. मात्र भारतीय चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे की पंत पुन्हा एकदा जखमी झाला आहे. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या या दुसऱ्या अनधिकृत कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पंतने तुफानी सुरुवात केली. मात्र दक्षिण आफ्रिका-अ चा वेगवान गोलंदाज त्सेपो मोरकीच्या गोलंदाजीदरम्यान त्याला सलग तीन वेळा दुखापत झाली.

पहिला चेंडू थेट त्याच्या हेल्मेटवर जाऊन बसला. काही वेळाने दुसरा चेंडू त्याच्या डाव्या कोपरावर लागला. तरीही त्याने खेळ सुरू ठेवला. पण तिसऱ्या वेळेस चेंडू थेट त्याच्या पोटावर आदळला आणि त्यानंतर पंत मैदानावर वेदनांनी तडफडताना दिसला आणि फिजिओथेरपिस्टशी चर्चा केल्यानंतर त्याने खेळ थांबवून मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याची दुखापत किती गंभीर आहे हे स्पष्ट झालेले नाही, मात्र त्याच्या या इजेमुळे टीम इंडियाची चिंता निश्चितच वाढली आहे. पंतने त्या वेळी 22 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 17 धावा केल्या होत्या आणि तो रिटायर्ड हर्ट झाला.

ऋषभ पंतची दुखापत, भारतासाठी चिंतेची बाब

ऋषभ पंत नुकताच दुखापतीतून सावरून दक्षिण आफ्रिका-अ विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी मैदानावर परतला होता. मात्र पुन्हा एकदा त्याला दुखापत झाल्याने ही भारतासाठी चिंतेची बाब ठरली आहे. कारण लवकरच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिकेची सुरुवात 14 नोव्हेंबरपासून होणार आहे.

हे ही वाचा –

ICC Womens World Cup : टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर ICCचा धडाकेबाज निर्णय! थेट वर्ल्ड कप फॉरमॅटमध्ये बदल, निर्णय ऐकून सगळे थक्क

आणखी वाचा

Comments are closed.