आशिया कप ट्रॉफी विवादावर अखेर निर्णय? मोहसिन नक्वी सोबतच्या भेटीनंतर BCCI ची पहिली प्रतिक्रिया समोर!

सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडियाने 28 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून आशिया कप 2025 (Asia Cup 2025) चे विजेतेपद पटकावले. मात्र, या विजयाला बराच काळ झाला असला तरी भारतीय संघाला अजूनही ट्रॉफी मिळालेली नाही. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे, टीम इंडियाला आशिया कपची ट्रॉफी अखेर कधी मिळणार?

दरम्यान, या ट्रॉफी संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. दुबईमध्ये सुरू असलेल्या ICC बोर्ड मीटिंगदरम्यान BCCI सचिव देवजीत सैकिया यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीनंतर असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, ट्रॉफी विवाद लवकरच सुटू शकतो.

मोहसिन नक्वी यांच्याशी भेटीनंतर देवजीत सैकिया यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे, मी ICC च्या औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही बैठकीत सहभागी झालो होतो. PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी हे देखील उपस्थित होते. जरी ट्रॉफीचा मुद्दा अजेंड्यात नव्हता, तरी ICC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माझी आणि नक्वी यांची स्वतंत्र बैठक झाली. चर्चा सकारात्मक होती आणि लवकरच यावर तोडगा निघेल अशी आशा आहे.

सध्या आशिया कपची ट्रॉफी दुबईतील आशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) मुख्यालयात ठेवलेली आहे. ACC अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, त्यांच्या परवानगीशिवाय ट्रॉफी तिथून हलवता येणार नाही.

दरम्यान, BCCI कडून सांगण्यात आले आहे की, दोन्ही बोर्ड हे प्रकरण शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता तणाव जवळपास संपला आहे. लवकरच ट्रॉफी टीम इंडियाकडे येईल, अशी अपेक्षा आहे.

आशिया कप 2025 चा अंतिम सामना दुबईत झाला होता, ज्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून किताब जिंकला होता. मात्र, सामन्यानंतर टीम इंडियाने PCB आणि ACC अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर संघ ट्रॉफी न घेताच भारतात परतला आणि तिथूनच हा विवाद सुरू झाला. आता मात्र परिस्थिती सुधारताना दिसत असून, टीम इंडियाला लवकरच आशिया कपची ट्रॉफी मिळण्याची शक्यता आहे.

Comments are closed.