वर्ल्ड चॅम्पियन ऋचा घोषचा बंगाल सरकारकडून मोठा सन्मान! आता सांभाळणार ही महत्त्वाची जबाबदारी
आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 (ICC womens World Cup 2025) जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार विकेटकीपर-फलंदाज ऋचा घोष (Richa Ghosh) जेव्हा बंगालमध्ये परतली, तेव्हा तिचं भव्य स्वागत करण्यात आलं. बंगाल सरकारने तिचा सन्मान करत तिला बंगाल पोलिसांमध्ये डीएसपी (उपअधीक्षक) पदावर नियुक्त केलं आहे.
शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः ऋचाला नियुक्तीपत्र दिलं आणि तिला प्रतिष्ठित ‘बंगभूषण पुरस्काराने’ सन्मानित केलं. या विशेष समारंभाला माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (saurav ganguly) आणि माजी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांसारखे दिग्गज उपस्थित होते.
22 वर्षांची ऋचा घोष हिने भारतीय महिला संघाला वर्ल्ड कप 2025 चे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर आयोजित सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ऋचाला डीएसपी पदाचे नियुक्तीपत्र दिलं.
याशिवाय बंगाल सरकारने तिला ‘बंगभूषण’ पुरस्कार आणि सोनेरी चैन भेट म्हणून दिली. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) नेही तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉल देऊन गौरव केला, तसेच 34 लाख रुपयांचं रोख बक्षीस दिलं.
वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऋचाने 24 चेंडूत 34 धावा केल्या, ज्यात 3 चौकार आणि 2 षटकार होते आणि त्या धावा भारताच्या विजयात निर्णायक ठरल्या.
तिने संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम प्रदर्शन केलं. एक अर्धशतकासह एकूण 235 धावा, आणि तिची सर्वोच्च खेळी 94 धावांची होती.
भारताच्या महिला संघाने हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली पहिल्यांदाच महिला वनडे वर्ल्ड कप 2025 जिंकत इतिहास रचला, दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत नवी मुंबईत हा विजय मिळवला.
Comments are closed.